सोळा वर्षीय तरुणीचा अंधश्रद्धेतून बळी

अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्यभर लढा देणा-या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनं सारा महाराष्ट्र सुन्न झालाय. त्याचवेळी नागपुरात एका सोळा वर्षांच्या तरुणीचा अंधश्रद्धेमुळं बळी गेलाय. कोणालाही संताप येईल अशी ही घटना.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 21, 2013, 11:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्यभर लढा देणा-या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनं सारा महाराष्ट्र सुन्न झालाय. त्याचवेळी नागपुरात एका सोळा वर्षांच्या तरुणीचा अंधश्रद्धेमुळं बळी गेलाय. कोणालाही संताप येईल अशी ही घटना.
अश्वेता मनकवडे या 16 वर्षांच्या तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या परिवारावर सध्या दु:खाचा डोंगर कोसळलाय. अश्वेताची प्रकृती दिड महिन्यापूर्वी बिघडली आणि तिला कावीळ झाल्याचं समोर आलं. पण हा जीवघेणा आजार झाला असला तरीही तिचे वडील भैय्याराव भोयर यांनी तिला डॉक्टरांकडे न नेता मंदिरात नेले. मंदिराची राख, पाणी आणि इतर साहित्य वापरून तिचा रोग बरा करण्याचा प्रयत्न केला. योग्य न झाल्यानं अश्वेताचा मृत्यू झाला. पण मनकवडे कुटुंबातला असा पहिलाच मृत्यू नसून अश्वेताची आई आणि बहिणीचाही असाच उपचाराविना मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय.
अश्वेताच्या मृत्यूने परिसरात खळबळ माजली आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत गुन्हा नोंदवला आणि तिचा मृतदेह विच्छेदनाकरता पाठवला. अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यास एखाद्या व्यक्तीचा बळीही जाऊ शकतो हेच यातून सिद्ध झालंय.
अंधश्रद्धा निर्मुलानासाठी आयुष्य वेचणा-या डॉ, नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात हत्या करण्यात आली.
या हत्येनंतर संतापलेल्या जनमानसानं राज्यभर उत्सुफुर्त निदर्शनं केली. मात्र नागपुरच्या घटनेनं समाजात आजही अंधश्रद्धा किती खोलवर रुजली आहे हे स्पष्ट झालंय. दाभोलकरांनी सुरु केलेली लढाई पूर्ण करण्यासाठी आता सर्वांनीच दाभोलकर होण्याची गरज आहे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.