www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
दुष्काळामुळं पाण्याचे दुर्भिक्ष आणि पावसाच्य़ा बेभरवशीपणामुळं यंदा खानदेशातल्य़ा कापूस पट्ट्यात मान्सूनपूर्व पेरण्याच झालेल्या नाहीत. दरवर्षी मान्सूनच्या आगमनापूर्वीच कपाशीच्या पेरण्या केल्या जातात. गेल्या वर्षी मान्सूननं दगा दिला. त्यात यंदा धरणं, तलाव आणि विहिरी कोरड्या पडल्यात. आणि यंदाही पावसाचा भरवसा नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरण्या टाळल्यात. त्यामुळं पेरण्याअगोदर बाजारातली लगबग यंदा कुठंही दिसत नाही. शेतकऱ्यांन यंदा पेरण्यांबाबत सबुरीची भूमिका घेतलीय. ‘पाऊस पडू द्या मग पेरणीचं पाहू’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.
कपाशीची लागवड थंडावलेलीच
कधीकाळी बागायती पूर्वहंगामी कापच्या लागवडीला बीटीचं वाण खरेदी करण्यासाठी दुकानांवर उड्या टाकणारे शेतकरी यंदा मात्र दुष्काळापुढं हतबल झालेत. जळगाव जिल्ह्यात विहिरी, बोअरवेल, धरणं सगळंच कोरडं ठाक पडलंय. त्यामुळे एप्रिलमध्येच होणारी कापसाची लागवड यंदा कुठंही दिसत नाहीय.
विदर्भाला मागे पाडत कापूस लागवडीत राज्यात अव्वल असलेल्या जळगावात दरवर्षी एप्रिल मे पासूनच पूर्वहंगामी बागायती कापसाची लागवड करण्यात येते. यंदा मात्र दुष्काळापुढं शेतकऱ्यांवर अक्षरशः हात टेकावे लागले आहेत. कपाशीच्या बियाण्यांसाठी बाजारात शेतकऱ्यांच्या उड्या पडायच्या. प्रसंगी खरेदीच्या वेळी मारामाऱ्याही व्हायच्या. यंदा मात्र बाजारात ‘बीटी’सह अन्य कंपन्यांचंही कापसाचं बियाणं मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळं शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीकडे सपशेल पाठ फिरवलीय.
मे महिना सरत आलाय तरी अजून कापसाच्या लागवडीचा पत्ता नाही. यंदा तर कापूस लागवडीसाठी चार लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र तयार आहे. शेतकरीही खरीपाच्या तयारीत गुंतलाय. आता गरज आहे ती फक्त पावसाच्या सरींची...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.