www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
जादूटोणाविरोधी विधेयक अखेर मंजूर झालंय. विधानसभेत एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलंय. तब्बल १४ वर्षांनंतर विधेयक मंजूर झालंय. आता सोमवारी हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेना आणि भाजपची विधेयकावर नाराजी कायम आहे. विधेयक सरकारनं घाईघाईनं मंजूर केल्याचा आरोप शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केलाय. दुसरीकडे जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झाल्याबद्दल डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र हमीद दाभोलकर यांनी स्वागत केलंय. विधेयक मंजूर झाल्यानं आनंद व्यक्त करत अंनिसची लढाई सुरुच राहणार असल्याचं हमीद यांनी म्हटलंय.
आता नवीन विधेयकातील तरतुदी काय आहेत, त्या पाहूया
> जुन्या मसुद्यात कोणाही तक्रार करण्याची तरतुद होती. मात्र आता नव्या मसुद्यात पीडित व्यक्ती किंवा त्याचे कुटुंबियच तक्रार करु शकतात.
> जुन्या मसुद्यात खालील कुठल्याही गोष्टींची स्पष्ट करण्यात आलीय. खालील गोष्टी करण्यास कोणतेही बंधन नसणार आहे.
- कोणत्याही धार्मिक वा आध्यात्मिक स्थळाच्या ठिकाणी, प्रदक्षिणा, यात्रा, परिक्रमा, पंढरपूरची वारी.
- हरिपाठी, कीर्तन, प्रवचने, भजने..
- पारंपरिक शास्त्रांचे, प्राचीन विद्या व कलांच्या शिक्षणाचे आचरण, प्रचार व प्रसार
- होऊन गेलेल्या संतांचे चमत्कार सांगणे, त्यांचा प्रचार, प्रसार, साहित्य वितरण करणे
- कोणाचेही शारीरीक वा आर्थिक नुकसान न करता आत्ताचे चमत्कार सांगणे व त्यांचा प्रचार-प्रसार करणे
- वैद्यकीय उपचारांपासून परावृत्त न करता, कुत्रा, साप, विंचू चावल्यावर टाकले जाणारे मंत्र, पारंपरिक मंत्र उपचार, रोग दुरुस्तीसाठी मंत्र उपचार
- मंदिरे, प्रार्थनास्थळे इत्यादी ठिकाणी केले जाणारे सर्व धार्मिक विधी
- गळ्यात किंवा हातात गंडेदोरे, ताईत, जानवे घालेणे, बोटात ग्रह खड्यांच्या अंगठ्या घालणे
- वास्तुशास्त्रानुसार घरात बदल सांगणे, जोशी ज्योतिषी, नंदीबैलवाले ज्योतिषी, इतर ज्योतिषांद्वारे दिला जाणारा सल्ला, जमिनीखालचे पाणी सांगणारे पाणके, पानाडी, डाऊझिंग करणारे व यावरुन सल्ला देणारे
जादूटोणा विधेयकाच्या जुन्या मसुद्यात या गोष्टींची स्पष्टता नव्हती. त्यामुळं याबाबत संभ्रम होता. मात्र विरोधकांच्या आग्रहानंतर आता नव्या मसुद्यात या बाबी समाविष्ट करुन ही स्पष्टता करण्यात आलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.