विजय पांढरेंवर आरोप, कशासाठी हा खटाटोप?

राज्यातलं सिंचनाचं वास्तव उघड करणारे मेरीचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा सिंचनातला अनुभव तोकडा आहे.. अशी खळबळजनक टिप्पणी यवतमाळच्या निम्न पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुधाकर बोरसे यांनी केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 5, 2013, 06:47 PM IST

www.24taas.com, यवतमाळ
राज्यातलं सिंचनाचं वास्तव उघड करणारे मेरीचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांचा सिंचनातला अनुभव तोकडा आहे.. अशी खळबळजनक टिप्पणी यवतमाळच्या निम्न पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुधाकर बोरसे यांनी केली आहे.
निम्न पैनगंगा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीनं पांढरे यांनी सुचवलेल्या शिरपूर पॅटर्नचा दाखला देऊन माहिती दिली होती, त्यावर उत्तर देतांना कार्यकारी अभियंता सुधाकर बोरसे यांनी त्यांचेपेक्षा वरिष्ठ असलेल्या विजय पांढरे यांच्यावर शिंतोडे उडविले आहे. पांढरे यांच्या कामाचे मूल्यमापन, त्यांचा अभ्यास, वागणूक यावर निंदा करणारी माहिती बोरसे यांनी दिली आहे. पांढरे अभ्यासपूर्ण वक्तव्य करीत नाही, प्रसिद्धीचा हव्यास असल्याने ते वादग्रस्त विधाने करतात, अशी टीका केली आहे. त्यांनी ४० टीएमसी पाण्याचा वापर शिरपूर पॅटर्नने करून दाखवल्यास त्यांना अभियांत्रिकी शाखेतील सर्वोच्च सन्मान द्यावा, मात्र केवळ पद आहे म्हणून विसंगत भाष्य करणं योग्य नाही, असा उल्लेख असलेली वादग्रस्त माहिती कार्यकारी अभियंता सुधाकर बोरसे यांनी दिली आहे.

बोरसेंच्या या आगाऊ माहितीबद्दल निम्न पैनगंगा संघर्ष समितीने त्यांचा निषेध नोंदवला आहे. एवढंच नव्हे तर बोरसेंच्या मतामागे बोलविता धनी वेगळा आहे, असा आरोपही समितीने केलाय.