मुंबई : एटीएसच्या रडारवर असलेला मुंबईमधून अचानक बेपत्ता झालेला मालवणीतल्या अयाजसोबत झी मीडियाच्या प्रतिनिधीनं व्हॉट्सअपवरून संवाद साधलाय. कदाचित पहिल्यांदाच आयसीससारख्या दहशतवादी संघटनेच्या समर्थकानं मीडियासोबत थेट संवाद साधलाय. मालवणीमधून गायब झालेल्या चार तरुणामधून दोघांची घरवापसी झालीय. मात्र दोन जण अजूनही फरार आहेत..यातल्या अयाजवरचा हा रिपोर्ट...
मुंबईतल्या मालवणीचा रहिवासी असलेल्या फरार अयाजचा मुंबई एटीएस कसून शोध घेत आहे. अयाज अफगाणिस्तानमार्गे आयसीसमध्ये सामील झाल्याचा संशय आहे. अयाज 30 ऑक्टोबर 2015 ला पुण्याला जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडला. मात्र अयाज मुंबईहून दिल्ली...आणि तिथून थेट काबूलला गेल्याचं एटीएसच्या तपासात पुढं आलंय.
झी मीडियाचे प्रतिनिधी अश्विनी पांडे यांनी अयाजसोबत व्हॉट्सअपवरून संवाद साधल्यानंतर अनेक खुलासे समोर आले आहेत. मात्र व्हॉट्सअप चॅट करणारा अयाजच होता का याची पुष्टी झी मीडिया करत नाही. मात्र समोरून अयाजच संवाद साधत असल्याची शक्यता वर्तवणारे अनेक संकेत आम्हाल मिळाले आहेत.
अयाजचा कुटुंबीयांनीच झी मीडियाला अयाजचा मोबाईल नंबर दिला होता. या नंबरच्या व्हॉट्सअप प्रोफाईलवर अयाजचाच फोटो होता. विशेष म्हणजे चॅट करणारा स्वत: अयाजच असल्याचीच बतावणी करत होता.
दोघांमधील व्हाट्स अॅप संभाषण :
अशिवनी पांडे - तुम्ही आयसीस ज्वाईन करत आहेत ?
अयाज सुलतान - मुळीच नाही, कोण म्हटलं ?
अश्विनी पांडे - आता तुम्ही कुठे आहात ?
अयाज सुलतान - भारतात
अश्विनी पांडे - मला तर माहिती मिळाली आहे की तुम्ही काबुलमध्ये आहात, मुंबईहून दिल्ली आणि पुढं काबुल गेले आहात.
अयाज सुलतान - काय फालतुपणा आहे, कोण म्हटलं ?
अश्विनी पांडे - तुमच्या पासपोर्ट एन्ट्रीवरून माहिती मिळाली
अयाज सुलतान - आजकाल बोगस (एन्ट्री) करणं सोपं आहे
अश्विनी पांडे - म्हणजे तुमच्या पासपोर्टची इमिग्रेशन एन्ट्री चुकीची आहे
अयाज सुलतान - शक्य आहे
अश्विनी पांडे - माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. यामुळं आपल्या परिवाराला मदत होईल. ते फारच चिंतेत आहेत.
अयाज - मी त्यांच्या सोबत बोलेन
अश्विनी पांडे - माझ्याशी बोलून जो तुमच्याबाबत गैरसमज आहे तो दूर होईल..जर हा गैरसमज असेल तर ?
अयाज सुलतान - नक्कीच, पण तुम्ही लोकं सर्व फालतू छापतात.
एवढंच नव्हे तर अयाज सुलताननं चॅट करत असतानाच आपला व्हॉट्सअप प्रोफाईल बदलला आणि आयसीसचा फोटो आपल्या प्रोफाईलवर ठेवला. अयाज आयसीसनं किती प्रभावित झालाय हे यातून स्पष्ट होतंय.