www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तरुण पिढी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात क्रेझ असणारे वायफाय लवकरच मुंबईकरांना मुंबईत कोठूनही आपल्या मोबाईल तसेच संगणकावर अॅक्सेस करता येणार आहे.
मुंबई शहर ‘वाय-फाय’ करण्याची घोषणा शिवसेनेनं आपल्या वचननाम्यात केली होती. त्यादृष्टीनं पालिकेनं पावलं उचलली आहेत. वायफायसाठी आवश्यक असलेली वेब सुरक्षा तसेच हॅकिंगपासून संरक्षण या तांत्रिक बाबींची तपासणी सुरु असल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिलीय. तसंच त्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून निविदा मागवण्यात येणार आहेत. महापालिकेची मुख्य इमारत आणि विभाग कार्यालयात लवकरच वायफाय यंत्रणा सुरु केली जाईल.
मुंबई हे `वाय-फाय` शहर बनवण्यासाठी ठिकठिकाणी नेटवर्क पॉइंट उभारावे लागणार असून त्याबाबत पालिकेची सध्या चाचपणी सुरू आहे. हे शहर वाय-फायमय झाल्यास त्याचा मोठा फायदा इंटरनेटसेवा अधिक वेगवान होण्यासाठी होणार आहे. तसेच मोबाईल युजर्सनाही ही सेवा पर्वणीच ठरणार आहे. वाय-फाय सेवा सुरू करण्याआधी त्याचे फायदे तसेच तोटेही तपासून पाहिले जात आहेत.
‘वाय-फाय’चा प्रयोग याआधी नवी मुंबईत करण्यात आला होता. पण, तिथं मात्र हा प्रयोग यशस्वी झाला नाही. आता मुंबईत हा प्रयोग यशस्वीपणे राबविला जाणार का याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.