मुंबई : शाळेमध्ये, अगदी ज्युनिअर केजीमध्ये प्रवेश मिळवणं म्हणजे गरीब घरातल्या पालकांसाठी मोठं आव्हान ठरतंय आणि त्यातही लहानग्या मुलीची आई डान्स बारमध्ये काम करत असेल तर...?
चेंबूरच्या इंदिरा नगरात राहणारी रितू (बदललेलं नाव) आणि तिची पाच वर्षांची मुलगी वैष्णवी (बदललेलं नाव)... इथल्या हिंदूजा नॅशनल सर्वोदय शाळेत ज्युनिअर केजीमध्ये वैष्णवीला प्रवेश मिळावा, म्हणून रितू गेल्या वर्षभरापासून शाळेमध्ये खेटे घालतेय. शाळेने वैष्णवीची मुलाखतही घेतली होती. पण, तिला प्रवेश मात्र नाकारण्यात आला. कारण रितू यापूर्वी एका डान्सबारमध्ये कामाला होत्या आणि म्हणूनच शाळा वैष्णवीला प्रवेश नाकारत असल्याचा आरोप रितूनं केलाय.
शाळा साधा प्रवेशाचा अर्जही रितूला देत नसल्यानं त्यांनी भ्रष्टाचार विरोधी समितीशी संपर्क साधला. समितीच्या कार्यकर्त्यांनीही कोणत्या आधारावर शाळा प्रवेश नाकारतेय, याची चौकशी केली. तेव्हा पालक डान्स बारमध्ये काम करत असल्यानं प्रवेश नाकारत असल्याचं कारण शाळेकडून देण्यात आलं, असं समितीचे सदस्य गणेश शेट्टी यांनी म्हटलंय.
ही माहिती मिळताच ‘झी मीडिया’ची टीम तिथं पोहोचली. पालक आणि एनजीओची तक्रार ऐकल्यावर आम्ही शाळेत पोहोचलो. शाळेचे प्राथमिक आणि माध्यमिकचे दोन्ही मुख्याध्यापक याबाबत बोलायला तयार नव्हते. हा संस्थाचालकांच्या अखत्यारीतला विषय असल्याचं सांगत त्यांनी टाळाटाळ केली.
पण ‘झी मीडिया’वर ही बातमी प्रसिद्ध होणार असल्याची कुणकुण लागताच, शाळेला सुबुद्धी सुचली. रितूच्या मुलीला, वैष्णवीला सिनीअर केजीमध्ये प्रवेश देतो, अशी ग्वाही ‘हिंदूजा नॅशनल सर्वोदय’ शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिली. यामुळे, वैष्णवीच्या आईचा, रितूचा आनंद त्यामुळं गगनात मावेनासा झालाय. आपल्या मुलीच्या शाळा प्रवेशासाठी मदत केल्याबद्दल त्यांनी ‘झी मीडिया’चे खास आभारही मानलेत.
प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून सरकारनं शिक्षण हक्क कायदा केला. पण हा कायदा पहिलीपासून लागू होतो. पूर्व प्राथमिक प्रवेशाबाबत राज्य सरकारनं अजूनही निश्चित धोरण आखलेलं नाही. पण केवळ कायदा करून समाजातील वंचित, पीडित घटकांना शिक्षण मिळणार नाही, त्यासाठी समाजानेही मानसिकता बदलण्यासाठी एक पाऊल पुढं टाकायला हवं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.