मुंबई : काँग्रेस नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका न करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे समर्थक रवींद्र फाटक यांना पक्षात घेऊन करुन दाखवलं. राणे यांचे नाव न घेता त्यांच्या सांत्वनाची गरज आहे. ते ज्या पक्षात जातील त्यांना तिथे शांती मिळो, अशी खोचक प्रतिक्रिया उद्धव यांनी दिली. तर राणे यांची आपल्याला किव येते. बुडता बुडता राणेंना अवदसा सुचली आहे, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी टीका केलीय.
नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले ठाण्यातले नगरसेवक रवींद्र फाटक यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केलाय. शुक्रमवारी नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी काहीही न बोलता राणेंना प्रत्युत्तर दिल्याचं मानलं जातंय.
शिवसेनेची पर्यायाने उद्धव ठाकरे यांची ही मोठी खेळी असल्याचं बोललं जातंय. नारायण राणे यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका हवेत संपते न संपते तोवर नारायण राणे यांच्या निष्ठावंताला शिवसेनेत आणत उद्धव यांनी हे काहीही न बोलता प्रत्युत्तर दिल्याचं मानलं जात आहे. एवढच नाही तर अजून काही काँग्रेसची बडी नावं आपल्या संपर्कात आहेत, शिवसेनेत य़ेण्यास उत्सुक आहेत असा गौप्यस्फोट शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी केलाय.
रवींद्र फाटक यांच्या शिवसेना प्रवेशाने काँग्रेसला फारसा फरक पडत नाही, असं जरी काँग्रेसने म्हटले असले तरी काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे यात शंकाच नाही. ठाण्यातले एकूण सात नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्याने पक्षाला हा फार मोठा फटका आहे.
रवींद्र फाटक आणि सात नगरसेवकांच्या या निर्णयामुळे ठाणे महानगरपालिकेतली सगळी समीकरणं बदलणार आहे. या लाटेत ठाणे महानगरपालिकेत एकहाती युतीची सत्ता राहणार आहे. दरम्यान रवींद्र फाटक यांच्या या पक्ष प्रवेशाने जितकी काँग्रेस संकटात आहे तेवढीच चिंता ठाण्यातल्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांनाही आहे.
आर्थिकदृष्ट्या भक्कम नगरसेवक शिवसेनेत आल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेतले निष्ठावंत बॅकबेंचवर फेकले गेलेत. आमदारकी रवींद्र फाटक यांच्या गळ्य़ात पडणार यात आता कोणतीही शंका नाही. त्यामुळे नरेश म्हस्के, अशोक वैती, अनंत तरे हे जुने शिवसैनिक नाराज असल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. एवढचं नाही तर खुद्द शिवसेना जिल्हाध्यक्ष आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या ताकदीलाही ठाणे जिल्ह्यात फाटकांच्या रूपात मोठं आव्हान निर्माण केल्याचीही चर्चा आहे.
आमदार एकनाथ शिंदे यांचं ठाणे जिल्ह्यात चांगलंच वर्चस्व आहे. त्यांच्या वर्चस्वाला धक्का लागेल अशीही शक्यता या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. दरम्य़ान नारायण राणे पुन्हा कोकणात काय बोलणार याकडे लक्ष आहे. आजही जर त्यांनी पुन्हा टीका केली तर आता कोणत्या राणे निष्ठावंताला शिवसेनेत घेऊन उद्धव प्रत्युत्तर देणार हे लवकरच समजेल, अशी चर्चा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.