मुंबई/नागपूर : राज्य विधिमंडळ अधिवेशनला आजपासून सुरुवात होत आहे. यात शेतकऱ्यांच्या समस्यांवरुन, विरोधक सरकारवर प्रश्नांचा भडीमार करणार आहेत. आता या अधिवेशनात तरी सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, इतकीच माफक अपेक्षा जाणकार व्यक्त करत आहेत.
पावसाने दडी मारल्यानं विदर्भातल्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवलं आहे. पेरण्या वाया गेल्यानं दुबार पेरणीची समस्या आहेच. म्हणून शेतकऱ्यांच्या विषयावर जास्त वेळ देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारनं करावा अशी अपेक्षा कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सोबतच आता शेतकऱ्यांना कर्ज माफी केल्यास बळीराजावरचा ताण कमी होईल असं जाणकारांचे मत आहे.
आधीचे सत्ताधारील आता विरोधक झाले आहेत. तर पूर्वीचे विरोधी पक्षाच्या बाकावरचे आता सरकारमध्ये बसले आहेत. मात्र शेतकऱ्यांची स्थिती आजही आहे तशीच आहे.
राज्यात आता पर्यंत ३६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर ७ ते ८ कोटी हजार रुपयांचं कर्ज असल्याचं कृषी तज्ज्ञ सांगतात. त्यातच मागील काही वर्षांपासून शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं, शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाला आहे. म्हणूनच शेतकऱ्याला सावरण्याची नितांत गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.