www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य शासनानं आखलेल्या ‘महिला फ्लीट टॅक्सी’ योजनेची अंमलबजावणी लवकरच होण्याची चिन्हं आहेत. या योजनेसाठी महिलांना लिलाव पद्धतीनं परवाने देण्यात येणार आहेत. याविषयी निविदाही (टेन्डर) जारी करण्यात आलीय.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळा मुंबईतील सामान्य महिलांनाही ‘चालक’ म्हणून संधी मिळणार आहे. मुंबईत टॅक्सी चालविण्यासाठी चालकाकडे परवान्याची आवश्यकता असते. हे परवाने लिलाव पद्धतीनं देण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य परिवनह विभागानं १ जानेवारीला निविदा जारी केलीय.
प्रवासी फोनद्वारे संपर्क साधून या फ्लिट टॅक्सी मिळवू शकतात. भांडवली गुंतवणूक, सुरक्षा अनामत, किमान परवान्यांची संख्या याबाबतच्या सर्वसाधारण फोन फ्लीट टॅक्सी योजनेतील अटी व शर्ती महिलांसाठी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम ६६ (अ) मध्ये शासनाने सुधारणा केल्या आहेत. ‘फोन फ्लीट टॅक्सी’ योजनेनुसार जास्तीत जास्त १००० परवाने, सुरक्षा अनामत ३ कोटी, इसारा रक्कम १ कोटी इत्यादींबाबत महिला फ्लीट टॅक्सीसाठी अटी शिथिल केल्या आहेत.
त्यामुळे, आता ‘महिला फ्लीट टॅक्सी’ योजनेसाठी जास्तीत जास्त १०० परवाने, सुरक्षा अनामत रक्कम १० लाख रुपये तर इसारा रक्क्म ३ लाख रुपये अशी ठेवण्यात आलीय. त्यानुसार शंका निरसनासाठी ६ जानेवारीपर्यंत पत्रव्यवहार, निविदापूर्व बैठक ९ जानेवारी, निविदा भरण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी असून या निविदा ४ फेब्रुवारी रोजी उघडण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. या योजनेअंतर्गत फक्त ‘महिला संचलित संस्था’ निविदा भरण्यास पात्र आहेत. अशा प्रकारची राज्यात राबविली जाणारी ही पहिलीच योजना आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.