www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
एलबीटीला तूर्तास स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. एलबीटी विरोधकांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र एलबीटी विरोधकांना कोणाताही दिलासा द्यायला आज सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय.
आता या प्रकरणाची पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. एलबीटीच्या प्रश्नी राज्यातले व्यापारी आक्रमक आहेत. त्यांनी राज्य सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिलाय. तर एलबीटीला कितीही विरोध झाला तरी एलबीटी लागू करण्यावर मुख्यमंत्री ठाम आहेत.
LBT प्रकरणी व्यापा-यांचा विरोध रास्त आहे, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यापा-यांचं समर्थन केलंय. मुंबईतल्या व्यापा-यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी व्यापा-यांना पाठिंबा दिलाय. मात्र व्यापा-यांनी दुकानं बंद करुन जनतेला वेठीस धरु नये असा सल्लाही राज यांनी व्यापा-यांना दिलाय.
LBT विरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधले व्यापारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. LBT लागू करण्याचा निर्णय रद्द होत नाही, तोपर्यंत संपावर जाणार असल्याचं व्यापा-यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे पुणेकरांचे उद्यापासून हाल होणार आहेत.