www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ ९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. पहिल्या १२ किमीपर्यंत ही भाडेवाढ नाही. ही भाडेवाढ १ आणि २ रूपये टप्प्यानुसार असणार आहे.
या भाडेवाढीमुळे साध्या, जलद, शहरी, रात्र आणि हिरकणी (निम-आराम) चा प्रवास महागणार आहे. १२ ते ६० किमीसाठी १ रूपया तर ६० च्यापुढे २ रूपये भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. दरम्यान, साधी, जलद सेवेच्या पहिल्या १२ किमीसाठी भाडेवाढ लागू असणार नाही. ही भाडेवाढ ९ नोव्हेंबरपासून केली जाणार असल्याने एसटीने प्रवास करणाऱ्यांच्या खिशावर भार पडणार आहे.
भाडेवाढीसाठी डिझेल दरवाढीचे कारण पुढे करण्यात आले आहे. वातानुकुलित सेवेच्या प्रवासभाड्यात नुकतीच १२ टक्के वाढ करण्यात आली होती. त्यामुळे यावेळी या सेवेत वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, नऊ नोव्हेंबरपूर्वी आरक्षण केलेल्या प्रवाशांचा या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. त्यांच्यांकडून प्रवासादरम्यान फरक वसुल केला जाणार आहे.
ही भाडेवाढ २.६ टक्के असून साध्या आणि जलद सेवेमध्ये प्रती किमी २.५ पैसे तर रात्र आणि निमआराम सेवेत प्रती किमी ३.३३ पैसे अशी वाढ होणार आहे. तर शहरी सेवेत ठरावीक अंतरानंतर १ रूपयाची वाढ होणार आहे. याआधी २ जुलै २०१३ रोजी करण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.