मुंबई : मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ या पुन्हा शिवसेनेत परतल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेमध्ये प्रवेश केला होता.
शुभा राऊळ या मनसेच्या तिकिटावर दहिसर विधानसभा मतदासंघून निवडणूकही लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेचे दहिसरचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्याशी त्यांचे टोकाचे वाद झाले होते. घोसाळकरांविरोधात केलेल्या तक्रारीची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दखल न घेतल्यामुळं त्यांनी शिवसेना सोडण्याच निर्णय घेतला होता आणि तो आमलात आणला.
दरम्यान, शुभा राऊळ यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहिसरमध्ये जंगी सभा घेतली होती. त्यावेळी राऊळ यांचे राज यांनी कौतुक केले होते. मात्र, पुन्हा त्या स्वगृही का परतल्या याचे कारण समजू शकलेले नाही. तर दुसरीकडे विनोद घोसाळकर यांच्या पराभवासाठी त्यांचा हातभार लागल्याचे दिसून येत आहे. पुन्हा त्या शिवसेनेत परतल्याने त्यांचे शिवसेनेत कसे स्वागत होते, याकडे लक्ष लागलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.