अणेंचा बोलविता धनी संघ आणि भाजप : राज ठाकरे

महाराष्ट्राचे महाधिवक्ते श्रीहरी अणेंचा बोलविता धनी संघ आणि भाजप आहे असा टोला राज ठाकरे यांनी हाणलाय.

Updated: Mar 22, 2016, 02:08 PM IST
अणेंचा बोलविता धनी संघ आणि भाजप : राज ठाकरे title=

मुंबई : महाराष्ट्राचे महाधिवक्ते श्रीहरी अणेंचा बोलविता धनी संघ आणि भाजप आहे असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाणलाय. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांना फोडून काढायला हवं, असंही राज ठाकरेंनी म्हटलंय.

आता नवीन वाद

वेगळ्या मराठवाड्याच्या मुद्द्यावरून श्रीहरी अणेंनी राजीनामा दिलेला असताना, स्वतंत्र मराठवाड्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही वादग्रस्त विधान केलंय. स्वतंत्र मराठवाडा ही लोकभावना आहे. पण अशी लोकभावना का झालीय, याचा विचार व्हायला हवा असं विजया रहाटकर म्हणाल्या. मराठवाडा दुर्लक्षित आहे, त्यांच्यावर अन्याय झालाय. असही रहाटकर म्हणाल्या...पण अणेंच्या वक्तव्यावर मात्र त्यांनी थेट विधान करणं टाळलंय. 

श्रीहरी अणे यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द केलाय. मराठवाडा हे वेगळं राज्य करण्याबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याचे काल महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटले. अणेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांसह शिवसेनादेखील आक्रमक झाली होती. त्यानंतर अणेंच्या वक्तव्याशी राज्य सरकार सहमत नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. 

आज सकाळी श्रीहरी अणेंनी राज्यपालांची भेट घेतली आणि आपल्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडं सुपूर्द केला. त्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याबाबत निवेदन केलं. या निवेदनानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अणेंनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. तर अणेंनी विदर्भाबाबत केलेल्या विधानाशी राज्य सरकार सहमत आहे का, याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केली.