मुंबई, नागपूर : भाजप विरूद्ध शिवसेना संघर्षाला आता नवं वळण लागलंय. शिवसेनेच्या 'सामना' मुखपत्रातून भाजपवर वारंवार टीकास्त्र सोडलं जातं. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता 'तरूण भारत'मधून शिवसेनेवर वार सुरू झालेत. दरम्यान, तरूण भारतच्या या अग्रलेखावर शिवसेनेकडूनही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
तरूण भारत कोण वाचतं? असा खोचक सवाल पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केलाय. आम्ही त्यांना अजिबात किंमत देत नाही, असा प्रतिटोला रामदास कदम यांनी लगावला आहे. उद्याच्या निवडणुकीत जनता कुणाला साडी घालायला लावील, ते चित्र स्पष्ट होईल, असं प्रत्त्युत्तर त्यांनी दिलं.
भाजप विरूद्ध शिवसेना संघर्षाला आता नवं वळण लागले आहे. सामनातून भाजपवर वारंवार टीकास्त्र सोडलं जातं. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता तरूण भारतमधून शिवसेनेवर वार सुरू झालेत. सत्तेत सहभागी असूनही मित्रपक्ष भाजपवर टीकेची झोड उडवणाऱ्या शिवसेनेवर नागपूर 'तरूण भारत'मधून तोफ डागण्यात आलीय. नागपूर 'तरुण भारत' च्या 'उसने अवसान' नावाच्या अग्रलेखातून शिवसेनेला ठोकून काढण्यात आलंय
भाजपवर शिवराळ भाषेत टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा, असा सल्ला शिवसेनेला देण्यात आलाय. सत्ताही सोडायची नाही आणि सतत टीकेचा सूरही सुरु ठेवायचा असा हा 'अर्धनारीनटेश्वरा'चा प्रयोग चाललाय, असा भडीमार तरूण भारतनं केलाय. 'उसने अवसान' नावाच्या अग्रलेखातून शिवसेनेला चांगलंच ठोकून काढण्यात आलंय.
भाजप, नरेंद्र मोदी, रा. स्व. संघ यांच्यावर आगपाखड करण्याचे सत्र शिवसेनेकडून रोजच सुरू झालेय. एकीकडे सत्तेत सहभागी व्हायचे, निर्णयात भागीदारी ठेवायची आणि त्याच निर्णयावर अद्वातद्वा टीकाही करायची, हे गणित काही सुज्ञ मतदारांना पटणारे नाही. लोक गल्लोगल्ली चर्चेत म्हणू लागले की, ‘‘शिवसेनेला जर भारतीय जनता पक्षाच्या सरकारची भूमिका पटत नसेल, तर त्यांनी केवळ शिवराळ भाषेत टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडले पाहिजे.’’ सत्ताही सोडायची नाही आणि आपले वेगळे अस्तित्व ठेवण्यासाठी टीकेचा सूरही चालू ठेवायचा, हा प्रकार चुकीचा आहे.
भाजप विरूद्ध शिवसेना ही लढाई आतापर्यंत उभय पक्षाच्या नेत्यांमध्ये सुरू होती. आता मुखपत्रांमधून ती लढली जातेय. अग्रलेखाला अग्रलेखानं उत्तर दिलं जातंय. एकमेकांवरचे हे प्रहार पाहिल्यानंतर, शब्दांना वास्तवाची धार आलीय, याची खात्री पटते, असे चित्र राज्यात दिसत आहे.