मुंबई : भारतामध्ये हवाई छायाचित्रणाची मुहूर्तमेढ रोवणारे सुप्रसिद्ध छायाचित्रकार गोपाळ बोधे यांनी आकाशात गरूडभरारी घेऊन टिपलेल्या महाराष्ट्राच्या वैभवशाली स्थळांचे विहंग दर्शन मुंबईकरांना घडणार आहे.
महाराष्ट्रातील गडकिल्ले, पुरातन श्रद्धास्थान-मंदीरे, प्रेक्षणीय स्थळ, निसर्ग सौंदर्य आणि मुंबईची ओळख बनलेली ठिकाणं आकाशातून कशी दिसतील? हे पाहण्याची नामी संधी भांडुप पूर्व येथील श्री गणेश सेवा मंडळाने उपलब्ध केली आहे. दोन बैठ्या चाळीतील पटांगणात एका अनोख्या पद्धतीने या प्रदर्शनाचे आयोजन गेली सतरा वर्षे केले जाते. गोपाळ बोधे यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव कौस्तुभ बोधे यांनी हा अतुल्य खजाना सर्वांपर्यंत पोहोचावा या हेतुने आजवर कोठेही प्रसिद्ध न झालेल्या छायाचित्रांसह हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शनिवार दि. 7 जानेवारी 2017 रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
कला प्रदर्शन बहुदा शहराच्या ठराविक भागातील बंदिस्त सभागृहात किंवा वातानुकुलीत दालनात आयोजित केले जाते. पण रोजची धावपळ आणि दगदगीचे आयुष्य जगणाऱ्या सर्वसामान्य लोकांना आवड असूनही किंवा विरंगुळा म्हणून अशा प्रदर्शनांचा आस्वाद घेता येत नाही. कांजूर-भांडुप हा तसा कष्टकरी चाकरमान्यांची वस्ती असलेला विभाग... येथील विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी कलाक्षेत्राकडे करीयर म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन ठेवावा आणि त्यांचे कलाभान जागृत राहावे यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात येतं.
कामगार बहुल वस्तीतील श्री गणेश सेवा मंडळ गेली सतरा वर्षे दोन बैठ्या चाळींतील मधल्या मोकळ्या जागेत सामाजिक, सांस्कृतिक आणि कला आदी विषयांवरील छायाचित्र किंवा वस्तूंचे प्रदर्शन तसेच स्वत: तयार केलेल्या माहितीपटांचे आणि लघुपटांचे आयोजन करून तेथील सामान्य नागरिकांचे प्रबोधन करत आहे.