मुंबई : शिवसेना भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. यावेळी निमित्त ठरणार आहे ते पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान नव्याने तयार होत असलेले ओशिवरा रेल्वे स्टेशन.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या स्टेशनचे उदघाटन अपेक्षित आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी या स्टेशनची पाहणी केली. काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनीही या स्टेशनच्या कामाची पाहाणी केली होती.
अनेक वर्षांपासून या स्टेशनचं काम रखडले होते. मात्र गेल्या दोन वर्षात हे काम पूर्णत्वाकडे नेण्याचं काम केल्याचा दावा देसाई यांनी केलाय. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला शह देण्यासाठी शेलार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी या स्टेशनची पाहणी केली.
शिवसेना आणि भाजप नेत्यांनी वेगवेगळी पाहणी केल्यामुळे स्टेशनच्या नावाचा वाद सुरु असताना ओशिवरा रेल्वे स्टेशनवरुन शिवसेना-भाजपमध्ये श्रेयाची लढाई सुरु झाल्याचे दिसत आहे.