मुंबई : शिवसेनेने आपले नव्या सहा प्रवक्त्यांची निवड केली आहे. ही निवड करताना खासदार संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. हा एक प्रकारे राऊत यांना धक्का मानण्यात येत आहे.
शिवसेनेकडून सहा प्रवक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चक्क संजय राऊत यांचे नाव प्रवक्तेयादीतून वगळण्यात आलेय. अरविंद सावंत, निल्हम गोऱ्हे, डॉ. मनिषा कायंदे, विजय शिवतारे, अरविंद भोसले, अमोल कोल्हे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेना प्रवक्तेपदावरून राऊत यांच्यासह सुभाष देसाई, मनोहर जोशी, श्वेता परूळकर यांचीही नावं वगळण्यात आली आहेत. राऊत यांनी गेल्या काही दिवसांत पक्षाला अडचणीत आणणारी विधानं केल्यामुळेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कठोर पावलं उचलल्याचं बोललं जातंय.
एकीकडे संजय राऊत यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करतानाच नारायण राणे यांचे कट्टर विरोधक अरविंद भोसले यांना मात्र पक्षानं बक्षिस दिलंय. भोसले शिवसेनेचे नवे प्रवक्ते असतील.
राणेंचा पराभव होईपर्यंत चपला न घालण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली होती. ते तब्बल ९ वर्षं अनवाणी राहिले. दोन दिवसांपूर्वीच शिवसैनिकांनी भोसलेंना सोन्याच्या चपला देत त्यांचा सत्कार केला होता. तर आज थेट पक्षानंच प्रवक्तेपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातलीये.
संजय राऊत यांची का झाली गच्छंती?
> संजय राऊत यांच्या जाहीर वक्तव्यामुळे पक्षाच्या भूमिकेबाबत विसंगी
> राऊत यांच्या भूमिकेमुळे शिवसेना-भाजप नेते दुखावले गेलेत.
> संजय राऊत यांच्या काही भूमिकेमुळे पक्षाला अडचणीत आणले गेल्याचे मत
> गेल्या काही दिवसांतील विसंगत भूमिकेमुळे शिवसेनेची नाचक्की झाली
> सामनातील अग्रलेखामुळे दिलगीर व्यक्त करण्याची ओढविलेली नामुष्की
> सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर झालेली टीका कारणीभूत!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.