मुंबई : बीएमसीच्या स्थायी समितीत भाजपने काँग्रेसच्या साथीनं शिवसेनेला हवा असलेला प्रस्ताव फेटाळून लावला होता. आज गुरूवारी बेस्ट समितीत काँग्रेसने यावेळी शिवसेनेला साथ देत भाजपला हवा असलेला प्रस्ताव फेटाळून लावला.
बेस्ट बसेसना लागणा-या डिझेलपैकी १० टक्के खरेदीसाठी सरकारी कंपन्यांबरोबरच खाजगी कंपन्यांकडूनही निविदा मागवल्या होत्या. रिलायन्स कंपनीने डिझेल दरात दीड टक्के सवलत देण्यास सहमती दर्शवल्यानं या कंपनीला काम मिळाले होते.
परंतु शिवसेनेसह काँग्रेसनं सर्वच १०० टक्के डिझेल खरेदीसाठी अशा प्रकारे टेंडर का मागवले नाही आणि दोन वेगळी टेंडर का काढली असा प्रश्न उपस्थित करत प्रस्ताव फेटाळून लावला. रिलायन्सला बेस्टमध्ये प्रवेश देण्यासाठी हा प्रस्ताव आणल्यानं त्याला विरोध केल्याचं सेना, काँग्रेसनं स्पष्ट केलं.
दरम्यान, बेस्ट कर्मचा-यांच्या सेवाशर्तींमध्ये एकतर्फी बदल करण्यास बेस्ट वर्कर्स युनियननं विरोध करत संपाचा इशारा दिलाय. बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कर्मचारी आणि अधिका-यांना दिले जाणारे सर्व भत्ते बंद केले जाणार आहेत. तसंच इतर सेवा सुविधांवरही गंडांतर येणार आहे. बेस्ट समितीमध्ये यासंदर्भातील प्रस्ताव येत आहे.