शिवसेनेत अनिल देसाईंवरून असंतोष

राज्यसभेतून निवडून आलेले शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागणार ही बातमी आल्यानंतर शिवसेनेत असंतोष पेटण्याची चिन्हं दिसून येत आहेत.

Updated: Nov 9, 2014, 12:33 PM IST
शिवसेनेत अनिल देसाईंवरून असंतोष title=

मुंबई : राज्यसभेतून निवडून आलेले शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागणार ही बातमी आल्यानंतर शिवसेनेत असंतोष पेटण्याची चिन्हं दिसून येत आहेत.

अनिल देसाई हे पहिल्यांदा राज्यसभेतून निवडून आलेले असले, तरी कित्येक वर्षांपासून लोकांमधून निवडून आलेले खासदार अजूनही मंत्रिपदापासून दूर आहेत. लोकसभेतून निवडून आलेले खासदार मंत्रिपदापासून दूर गेल्याने पहिल्यांदा शिवसेनेत असंतोष दिसून येत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठ्या प्रमाणात जागा जिंकता आल्या. मुंबई आणि उपनगरांत तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातून लोकांनी शिवसेनेच्या बाजून कौल दिला असतांना देखिल, भाजपचं संख्याबळ जास्त असल्याने त्यांची हाजी हाजी शिवसेनेच्या काही नेत्यांकडून केला जात आहे.

या गोष्टीचा रागही शिवसैनिक आणि शिवसेना नेत्यांमध्ये होता, मात्र अनिल देसाई यांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता वाढल्याने शिवसेनेत अंतर्गत असंतोष धुमसत असल्याची माहिती मिळतेय.

उद्धव ठाकरे हे शिवसेनेकडून एकटे शिलेदार असतांना, शिवसेनेला लोकांनी विधानसभेत भरभरून मतदान केलं, मोठ्या प्रमाणात यश आलं, मात्र भाजपच्या दबावाला बळी जायचं नाही, म्हणून अनेक वर्षांपासून निवडून आलेल्या खासदारांनी मंत्रिपदाची अपेक्षा ठेवली नाही. 

मात्र ऐनवेळेस भाजपबरोबर सत्तेत येण्याचा निर्णय होण्याची शक्यता आणि अनिल देसाई यांना मंत्रिपद मिळवण्याचे संकेत मिळाल्यानतंर शिवसेनेत असंतोष धुमसतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.