शिवसेना विरोधात बसणार, गिते राजीनामा देणार - सूत्र
मुंबई : सत्तेतील सहभागाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेलेले शिवसेना खासदार अनंत गिते रिकाम्या हातानं मुंबईत परतले. त्यामुळे भाजपनं दिलेल्या या अपमानास्पद वागणुकीवर शिवसेना चांगलीच संतापलीय.
यानंतर, शिवसेनेनं विरोधात बसण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. किंबहुना सेनेनं विरोधात बसावं, अशीच भावना पक्षाच्या सर्व नेत्यांनी व्यक्त केलीय.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळातून अनंत गितेंना राजीनामा आदेश देण्यात आल्याचंही समजतंय. अनंत गितेही राजीनामा देण्यास तयार असल्याची माहिती मिळतेय. तर, दुसरीकडे भाजपनंही एकटं जाण्याची तयारी केलीय.
आजही केला भाजपनं सेना नेत्यांचा अपमान... काय घडलं नेमकं?
‘शिवसेनेचे दूत’ बनून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी गेलेले गिते पंतप्रधानांना न भेटताच मुंबईत परतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केल्यानंतर गिते मुंबईत आलेत. त्यामुळं शिवसेना-भाजपमधली दरी वाढलीय. यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची उद्या (रविवारी) मुंबईत बैठक बोलावलीय. सत्ता सहभागाबाबत या बैठकीनंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. कोकणातील आमदार या बैठकीसाठी मुंबईकडे रवाना झालेत.
दरम्यान, शनिवारी दिल्लीत दाखल झालेल्या गीतेंनी पीएमओ कार्यालयाकडे मोदींना भेटण्याची वेळ मागितली होती. पीएमओ कार्यालयानं तीन वाजता मोदी भेटणार असल्याचं सांगितलं... गीतेंनी ६.३० वाजेपर्यंत वाट बघितली, पण मोदी आलेच नाहीत. यानंतर गितेंनी पंतप्रधान निवासस्थानी संपर्क साधला पण, मोदी फोनवरही उपलब्ध होऊ शकले नाहीत.
त्यानंतर महाराष्ट्राबद्दल शहा निर्णय घेतील, असा निरोप मोदींकडून गितेंना धाडण्यात आला. अनंत गितेंनी अमित शाहंना फोन केला तेव्हा ‘आधी पाठिंबा द्या, उद्या देसाईंना तुमच्याकडून पाठवा, महाराष्टाबाबत नंतर बोलू’ असं एकप्रकारे बजावतच शहांनी फोन कट केला.
याबाबतची, सगळी हकीगत जेव्हा गितेंनी उद्धव ठाकरेंना फोनवरुन हकीकत सांगितली तेव्हा उद्धव ठाकरे या अपमानानं चांगलेच चिडले. त्यांनी गितेंना ताबडतोब मुंबईकडे येण्यास सांगितले. त्यानंतर, गिते पावणेसात वाजता विमानतळाकडे निघाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
शिवसेना विरोधात बसणार, गिते राजीनामा देणार - सूत्र