मुंबई : भाजप-शिवसेनेचं सत्तेशी लग्न लागलं खरं. मात्र दोघांचा संसार रडत-खडतच चाललाय. अनेक विषयांवरून दोघांमध्ये वादांची मालिका अजूनही सुरू आहे. उत्सवांचा वाद निवळला तोच भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी स्वबळाची भाषा केली खरी, मात्र शिवसेनेनं या वक्तव्याची खिल्ली उडवलीय.
दोन पक्षांमध्ये एलईडीवरून वाद, कोस्टल रोडवून वाद, उत्सवांवरून वाद सुरुच होते. हे वाद मिटले न मिटले तोच भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या वक्तव्यामुळं भाजप-शिवसेनेत पुन्हा आमनेसामने उभं ठाकण्याची शक्यता निर्माण झालीय. भाजप अध्यक्ष अमित शाह मुंबईत पक्षाच्या महाजनसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमाला आले आणि शिवसेनेशी संपर्क न करताच निघून गेले.
मात्र, जाता जाता त्यांनी भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार राहा असा आदेशच दिला. ते येवढ्यावरच थांबले नाहीत. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करावी लागली याची खंत आहे. अजून किती दिवस इतरांच्या मदतीनं सत्ता सत्ता मिळवायची? असा सवाल करत आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.
आता अमित शाह मुंबईत येवून डिवचून गेले आणि शिवसेनेची सटकली नसेल तर नवलच. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी थेट राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये स्वबळावर असलेल्या भाजप सरकारची खिल्ली उडवत अमित शाहांच्या स्वबळाच्या कल्पनेचं स्वागत केलं.
गेल्या विधानसभेत शिवसेनेच्या दबावाला झुगारून भाजपनं ऐनवेळी स्वबळावर निवडणुका लढल्या ख-या. मात्र सत्ता स्थापण्यासाठी शिवसेनेच्या कुबड्यांचा आधार घ्यावाच लागला. त्यामुळं आता मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेनेच्या दबावाला बळी न पडण्याची रणनिती भाजपनं आखली असली तरी मुंबईत स्वबळाच्या मार्गावरील काट्यांची जाणीव भाजपला आहे. युती होणार की नाही, हे आताच सांगणं कठीण असलं तरी या निमित्तानं पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडलीय हे मात्र नक्की.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.