मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला जोरदार चिमटा काढला. शिवसेना मंत्र्यांना फटकारताना म्हटले शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे दिलाय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधून एसटी व परिवहन विभागातर्फे शनिवारी मुंबईतील एका कार्यक्रमात सहा नव्या योजनांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानांमुळे दोन्ही पक्षांतील धुसफूस पुढे आलेय.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन रिमोटद्वारे केले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान, हाच धागा पकडत या रिमोटमुळे बाळासाहेबांची आठवण झाल्याचे सांगितले. बाळासाहेबांची जयंती आणि रिमोटद्वारे उद्घाटन हा अनोखा योगायोग जुळून आल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब हेदेखील रिमोट कंट्रोलने सगळ्यांवर नियंत्रण ठेवत असत, असे सांगत उद्धव यांनी शिवसेना-भाजप युतीच्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, उद्धवजींनी सांगितले की बाळासाहेबांकडे सत्तेचा रिमोट कंट्रोल होता. बाळासाहेबांनंतर तो उद्धव यांनी तो सांभाळला. मात्र, आता मुख्यमंत्री या नात्याने सत्तेची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्यामुळे उद्धवजींनी हा रिमोट कंट्रोल माझ्याकडे दिला आहे, ही गोष्ट इतर मंत्र्यांनी समजून घेतली पाहिजे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना एकप्रकारे समज दिली.