मुंबई : शीना बोरा हत्याकांड प्रकरणानं सगळ्यांनाच हादरवून टाकलंय... अगदी फिल्मी वाटावी अशा या घटनेचे अनेक पदर पोलिसांच्या तपासात उलगडत चाललेत. या प्रकरणात आज मुंबई पोलीस स्टार टीव्हीचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.
पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी, इंद्राणीचा दुसरा नवरा संजीव खन्ना आणि इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम राय हे सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत. संजीव अलीपूरमध्ये मित्राच्या घरी लपला होता, तिथून पोलिसांनी त्याला अटक केलीय.
अधिक वाचा : शीना बोरा प्रकरणातील कंगोरे... संपत्ती, सेक्स आणि धोका
दरम्यान पोलिसांनी, इंद्राणीचा मुलगा आणि मृत शिनाचा भाऊ मिखाईल तसंच पीटर मुखर्जी यांचा मुलगा (पहिल्या लग्नापासून) राहुल यांचीही चौकशी केलीय.
रात्रभर शीनाचा मृतदेह मुखर्जी यांच्या घरीच होता
शीना बोरा हिची २४ एप्रिल २०१२ रोजी गाडीतच गळा दाबून हत्या करण्यात आली. यावेळी गाडीत इंद्राणी, संजीव खन्ना (दुसरा पती) आणि ड्रायव्हर उपस्थित होते. त्यानंतर तिचा मृतदेह रात्रभर पीटर मुखर्जी यांच्या घराच्या परिसरात उभ्या असलेल्या गाडीतच होता.
दुसऱ्या दिवशी त्याच गाडीनं शीनाचा मृतदेह रायगडच्या जंगलात नेण्यात आला. इथं, शीनाचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याची माहिती, मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.