'शरद पवार राजकारण्यांसाठी आधारवड'

12 डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस... याच निमित्तानं शरद पवारांचा  भव्य अमृतमहोत्सवी सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आलाय. 

Updated: Dec 12, 2015, 10:10 PM IST
'शरद पवार राजकारण्यांसाठी आधारवड' title=

मुंबई : दिल्लीतल्या जंगी कार्यक्रमानंतर शरद पवारांच्या अमृतमहोत्सवाचा जोरदार कार्यक्रम मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला राज्यातले सर्व पक्षांचे दिग्गज उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, उद्योगपती मुकेश अंबानींसह अनेक दिग्गज हजर होते. यावेळी सर्वांनीच पवारांवर स्तुतीचा वर्षाव केला. यावेळी सुलोचनादीदी आणि  मान्यवरांच्या हस्ते शरद पवारांचा सत्कार करण्यात आला.. तसंच पवारांवरील आधारवड या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं... महाराष्ट्राच्या जनतेने भरभरुन प्रेम दिल्याची कृतज्ञता यावेळी शरद पवारांनी व्यक्त केली.

शरद पवार हे राजकारण्यांसाठी आधारवड आहेत. पवारांचे सर्वांशीच जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं एकनाथ खडसे यांनी प्रांजळपणे कबूल केलं. 

राज ठाकरेंच्या भाषणात उद्धव ठाकरेंची एन्ट्री

शरद पवारांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकाच मंचावर आले. विशेष म्हणजे राज ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच उद्धव ठाकरेंची  अनाहूत एन्ट्री झाली. याचं टाईमिंग साधत राज ठाकरेंनी आपले ज्येष्ठ बंधू उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं. उद्धव ठाकरेही थेट डायसजवळ जात राज ठाकरेंना पाहून हसले. त्यामुळं पवारांच्या कार्यक्रमात वेगळीच रंगत निर्माण झाली. 

 


आधारवड

राज ठाकरे म्हणतात... 
यावेळी, इथं पवारांसोबत बाळासाहेब हवे होते, असं म्हणत राज ठाकरेंनी भावनिक साद घातली. पवारांचा जास्तीत जास्त सहवास हा वर्तमानपत्रांतून लाभल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. तसंच पवारांनी स्तुती केली की भीती वाटते, प्रत्येक घटनेत पवारांचा हात असतो, असं म्हणत आपली खास ठाकरे शैलीही त्यांनी यावेळी वापरली. 

उद्धव ठाकरे म्हणतात... 
राजकारण काहीही असो... शरद पवार ही एक वेगळीच व्यक्ती आहे... ते एक वेगळंच रसायन आहे, असं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तर त्यावेळीच पवारांचा 'बारा'चा महिमाही त्यांनी वर्णन केला... आज तारीख बारा... महिना बारावा... पवारांची 'बारा'मती... आणि अनेकांचे बाराही वाजवलेत! असं म्हणत त्यांनी टाळ्या मिळवल्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.