ओला-उबेर हटाओ! टॅक्सी संपाचा दुसरा दिवस

स्वाभिमान टॅक्सी युनियनचा संप आज दुसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. 

Updated: Sep 2, 2015, 12:46 PM IST
ओला-उबेर हटाओ! टॅक्सी संपाचा दुसरा दिवस title=

मुंबई : स्वाभिमान टॅक्सी युनियनचा संप आज दुसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. 

अॅप बेस ओला आणि उबेर या टॅक्सी कंपन्यांना विरोध करत नितेश राणे यांच्या या युनियननं काल अचानक संप केला होता. मात्र, त्यानंतरही सरकारनं आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार न केल्यामुळे संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं संघटनेचे प्रभावी मेहुल जोशी यांनी स्पष्ट केलंय. 

दरम्यान, पहिल्या दिवशी मात्र संपात सहभागी न झाल्यास संपकरी लोकांकडून टॅक्सीवर हल्ला होईल, या भीतीनं इतर टॅक्सीचालकही धास्तावलेले आहेत. त्यामुळे त्यांनीही विश्रांती घेणं पसंत केलं.

का होतोय ओला-उबेरला विरोध?

उबेर, ओला या खाजगी कंपन्या मोटार वाहन कायद्यांतर्गत येत असल्याने त्यांच्यासाठी नियमावली तयार करणे हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नसल्याचं स्पष्ट झालंय. या कंपन्यांचा फटका काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांना बसत असल्याचं स्वाभीमानी संघटनेचं म्हणणं आहे. पण, उल्लेखनीय म्हणजे या संपाचा परिणाम म्हणून सध्या याच कंपन्यांना फायदा मिळतोय. 

सध्या काळ्या-पिवळ्या, फ्लिट, रेडिओ टॅक्सींसाठी वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे बराच गोंधळ होतोय. यावर तोडगा काढण्यासाठी सर्व टॅक्सी सेवांसाठी एकाच नियमावली प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचा मसुदा राज्य सरकारकडे सादर करण्यात आलाय, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयानं दिलीय. एकच नियमावली असल्यानं सर्व टॅक्सी सेवांचा परिसर, भाडेवाढ, सुरक्षा याबरोबरच सर्व नियम, अटी एकच राहतील. एकाच नियमावलीमुळे कोणावरही अन्याय होणार नाही, असं म्हटलं जातंय.  

मुंबईत एसएमएस टॅक्सी कॅब्ज, लाइव्ह माइंड सोल्युशन, मेरू कॅब, कारझॉनरेंट इंडिया प्रा.लि., प्रियदर्शनी टॅक्सी, टॅक्सी फॉर शुअर, उबेर कॅब, ओला, कॅब्जो, टॅब कॅब, मेरू फॅक्ल्सी या कंपन्यांच्या १० ते १२ हजार कॅब आहेत. तर काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्या जवळपास ३५ हजार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.