मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन तास पाकिस्तानला भेट दिली. यावेळी नवाझ शरीफ यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्यात. यावेळी चर्चा झाली मात्र, तपशील समजला नाही. परंतु शिवसेनेने भेटीवर खोचक सवाल उपस्थित केलाय.
नरेद्र मोदींनी पाकिस्तानला अचानक दिलेल्या भेटीमुळे विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेनेने मोदींच्या पाकिस्तान भेटीवर टोलेबाजी केली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोदी अफगणिस्तानवरून थेट पाकिस्तानला गेले आहेत. आपले पंतप्रधान पाकिस्तानला गेले ही खूपच मोठी गोष्ट आहे. मात्र, दाऊदला ते परत आणू शकले तर त्यांच्या दौऱ्याचे स्वागत होईल.
मोदी मित्रपक्षांशी अशा गोष्टींबद्दल बोलत नाहीत, त्यांचा सल्ला घेत नाहीत ही वेगळी गोष्ट आहे. आज नवाझ शरीफ यांचा तर उदया दाऊद इब्राहिमचा वाढदिवस आहे. मोदी-शरीफ भेटीनंतर पाकिस्तान दाऊदला भारताच्या ताब्यात देणार असतील तर मोदींच्या दौऱ्याचे स्वागत करायल हरकत नाही. पाकिस्तानबद्दलची शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. जो पर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही, तो पर्यंत त्यांच्याशी कुठलीही चर्चा करु नये, असे ते यावेळी म्हणालेत.