राज ठाकरेंची काल चिथावणी, आज अज्ञानाताने 'रिक्षा' जाळली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रिक्षा जाळण्याचा आदेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंधेरीमध्ये एका रिक्षाला अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिलंय. 

Updated: Mar 11, 2016, 12:14 AM IST
राज ठाकरेंची काल चिथावणी, आज अज्ञानाताने 'रिक्षा' जाळली title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रिक्षा जाळण्याचा आदेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंधेरीमध्ये एका रिक्षाला अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिलंय. 

चार बंगला परिसरात अंधेरी आरटीओ कार्यालयाबाहेर गुरुवारी रात्री उशीरा एका रिक्षाला पेटवून देण्यात आलंय. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस दाखल झाले आहेत. रिक्षा क्रमांक एम एच ०२ व्ही ए ३२५८ या क्रमांकाची रिक्षा जाळण्यात आलीय. या घटनेची जबाबदारी अद्याप कुणी घेतली नसली तरी काल राज ठाकरेंच्या भाषणानंतर उमटलेली ही प्रतिक्रिया आहे, असं म्हटलं जातंय. या घटनेचा तपास सुरू झालाय.  

काय होता राज ठाकरेंचा आदेश... 

७० हजार रिक्षा परवाने दिले जात आहे, त्यातील ७० टक्के परवाने परप्रांतीयांना दिले जात आहेत. १५ वर्षांच्या वास्तव्याचा दाखला तात्काळ देण्याची गरज नाही, अशी अट ठेवण्यात आलीय. वाटेल तेव्हा वास्तव्याचा दाखला जमा करा, काही आढळल्यास परवाना रद्द करा, असं म्हणत 'रस्त्यावर दिसणाऱ्या नव्या रिक्षा जाळून टाका' असा आदेश राज ठाकरेंनी दिला होता. 

असा आदेश देताना, प्रवाशांना उतरवा आणि मग रिक्षा जाळा... नव्या येणाऱ्या रिक्षा, मी सांगतो आहे, नाही तर रिक्षाचं बिल मागतो म्हणून जाळाल, असंही राज ठाकरेंना त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगावं लागलं होतं. 

मनसेची जाळपोळ - तोडफोड

दरम्यान, गुरुवारी मनसे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश सागर यांच्या प्रतिमेचं दहनही केलं. योगेश यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. दहाव्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंनी मराठी आणि मराठी माणसांचा मुद्दा उचलून धरला होता. यानंतर, चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशीही सुरू केली होती.