सयामींना दिलं जीवनदान, साजरा केला वाढदिवस

सयामी जन्माला आलेल्या मुलींना जीवनदान देणाऱ्या वाडिया बाल रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात आज वाढदिवस साजरा केला.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 8, 2014, 05:24 PM IST

www.24taas.com, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई
सयामी जन्माला आलेल्या मुलींना जीवनदान देणाऱ्या वाडिया बाल रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात आज वाढदिवस साजरा केला. रिद्धी आणि सिद्धी या दोन पऱ्या सभागृहात आल्यावर सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.
परळमधील वाडिया बाल रुग्णालयात लहान मुलांच्या रडण्याच्या आवाजाबरोबरच आज हँपी बर्थडेचे शब्दही कानावर पडत होते....कारण आज खास अशा दोन लहानगींचा वाढदिवस होता. रिद्धी आणि सिद्धी या दोन जुळ्या बहिणींचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी रुग्णालयातील सभागृह सजवले होते.
रिद्धी आणि सिद्धी या दोघीही या जगात एकाच वेळी आल्या ख-या परंतु एकच शरीर घेवून...म्हणजे दोन डोकी असली तरी धड एकच होते..अशा विचित्र स्थितीत असलेल्या या दोघींना वेगळं करून जीवनदान देण्याचं आव्हान वाडिया हॉस्पीटलनं घेतलं आणि त्यांच्यावर त्यांच्यावर १० मे २०१३ रोजी पहिली तर १७ जानेवारी २०१४ रोजी दुसरी शस्त्रक्रिया करून त्यांना वेगळं करण्यात आलं. अजूनही त्यांच्यावर चार शस्त्रक्रिया होणं बाकी असून पुढील वाढदिवसाला त्या स्वत: चालत येतील असा विश्वास वाडिया बाल रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. वाय के आमडेकर यांनी व्यक्त केला.
रिद्धी सिद्धीचे आई वडिल गरीब असल्यानं आर्थिक मदतीचा हात पुढं केला तो सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनं....म्हणूनच या दोघींची नावं रिद्धी सिद्धी ठेवण्यात आलंय. या दोघींचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी रुग्णालयातील सर्व कर्मचारी तर होतेच शिवाय स्थानिक राजकीय नेतेही आले होते. तसंच विशेष उपस्थिती होती ती दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मी राय हिची...वाढदिवसाची भेट म्हणून विविध वस्तूही आणल्या गेल्या होत्या.....बच्चे कंपनीच्या उपस्थितीत अखेर दोघींचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
रिद्धी सिद्धीला जीवनदान देण्याबरोबरच त्यांचा पहिला वाढदिवस एवढया मोठ्या उत्साहात साजरा करून वाडिया रुग्णालयानं या दोघींच्या आयुष्यातील आनंद द्विगुणित केलाय एवढं मात्र नक्की..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.