मुंबई उपनगरांसह पुणे कोकणात वादळी पाऊस, वाहतूक विस्कळीत

मुंबई उपनगरांसह पुणे आणि कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुंबईकडे येणारी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. जुन्या हायवेवरील वाहतूकही विस्कळीत असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 7, 2014, 06:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई उपनगरांसह पुणे आणि कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुंबईकडे येणारी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. जुन्या हायवेवरील वाहतूकही विस्कळीत असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज सायंकाळी अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसानं झोडपून काढलं. मुंबई उपनगरांसह नवी मुंबई, कल्याण, बदलापूर, कर्जत, नेरळ, खालापूर, खोपोली, लोणावळा, खंडाळा भागात वादळी वा-यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. त्याशिवाय कोकणातील महाड, रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, सिंधुदुर्ग भागातही पावसाच्या सरी कोसळल्या.
जोराचा पाऊस आणि वादळी वा-यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 म्हणजे जुन्या मुंबई-पुणे हायवेवर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झालीय. तर जाहिरातीचं मोठं होर्डिंग रस्त्यातच कोसळल्यानं पुण्याहून मुंबईला येणारी एक्स्प्रेस वेवरील वाहतूकही ठप्प पडलीय.
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जत-नेरळच्या दरम्यान झाड पडल्याने काही काळापासून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. रेल्वेच्या कर्मचा-यांनी हे झाड ट्रॅकवरुन बाजुला काढायला सुरुवात केल्याने काही वेळातच ही वाहतूक सुरळीत होण्याची आशा आहे. याशिवाय कर्जत-मुरबाड रस्त्यावर काही ठिकाणी झाडं तसेच विजेचे खांब पडल्याने काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.