www.24taas.com, मुंबई
शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील द्वंद्व साऱ्यांनाच परिचयाच आहे. यावेळेस रामदास कदम आणि नारायण राणे यांच्यात वाद उद्भवला आहे.`नारायण राणे, खोटारडेपणा बंद करा! माझ्यावरील आरोप सिद्ध करा नाहीतर माझ्याकडे घरगडी व्हा, असे आव्हान शिवसेनानेते आमदार रामदास कदम यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांना दिले आहे`. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनातून रामदास कदम यांनी राणेंची हेटाळणी केली आहे.
‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमातील शेवटच्या सत्रात राणे यांनी रामदास कदम यांना काल्पनिक फोन लावला होता. तेव्हा राणेंनी कदमही माझ्यासोबत कॉंग्रेसमध्ये येणार होते असे विधान केले होते. त्याचा कदम यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले, राणेंच्या पक्षनिष्ठेची विष्ठा झाली. त्यामुळेच त्यांनी मलाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. हिंमत होती तर त्यांनी मला थेट फोन करायचा होता. काल्पनिक फोनवरील राणेंचे वक्तव्य म्हणजे त्यांच्या भ्याडपणाचे लक्षण आहे, असा टोलाही कदम यांनी लगावला.
शिवसेनाप्रमुखांनी राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याच्या दोन दिवस आधी मला त्यांचे सारखे फोन येत होते. ते मला त्यांच्या बंगल्यावर बोलावत होते. पण मी आधी शिवसेनाप्रमुखांच्या रंगशारदा येथील सभेला जाईन नंतरच तुमच्या बंगल्यावर येईन असे त्यांना ठणकावून सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेते पद मला सहा महिन्यांनंतर मिळाले हे राणे विसरले काय? असा सवालही कदम यांनी केला.