मुंबई : बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी येणारे पाकिस्तानी कलाकार हे काही दहशतवादी नाहीत, असं म्हणणाऱ्या सलमान खानवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.
सलमान खानला चित्रपटात नकली गोळ्या लागतात, त्या लागल्यावर तो उठून उभा राहतो. भारतीय जवानाला मात्र खऱ्या गोळ्या खाव्या लागतात, त्या फिल्मी नसतात, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
इंग्रजी वृत्तवाहिनी टाईम्स नाऊला राज ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सलमानची ट्यूबलाईट मध्येच पेटते, मागच्या वेळसारखा तो यंदा रात्री बोलला नसावा असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला आहे.
उरी हल्ल्याचा निषेध करायला पाकिस्तानी कलाकारांनी नकार दिला, आम्ही पाकिस्तानी नागरिक असल्याचं त्यांनी सांगितलं, तशी भूमिका आमचे कलाकार का घेत नाहीत, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. कलाकाराला कोणत्याही सीमेचं बंधन नसतं असं म्हणता, उद्या भारतीय जवानांनी शस्त्र खाली ठेवून गुलाम अलींचा कार्यक्रम बघायला जातो सांगितलं तर चालेल का असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला आहे.