www.24taas.com, मुंबई
शिवसेनेला राम-राम ठोकल्यानंतर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ‘मनसे’ राज ठाकरेंच्या बाजुला उभं राहण्याची तयारी दाखवली. मात्र, राज ठाकरेंनी उपरकर यांना ‘उपरे’ असं संबोधत त्यांच्या पक्षात पाऊल ठेवण्याच्या इच्छेला लाल झेंडा दाखवलाय.
कोकणातील शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्षातून बाहेर पडल्यानंतर पक्षनेतृत्व आणि इतरांवर चांगलीच टीका केलीय. त्यामुळे कदाचित मनसेमध्ये जाण्याचा मार्ग सुकर होईल अशी आशा त्यांना असावी. तशी इच्छा त्यांनी गोवा भेटीत राज ठाकरे यांच्यासमोर व्यक्तदेखील केली होती. त्यावेळी सध्या तुम्हाला मनसेत घेता येणार नाही, असे राज यांनी स्पष्ट केल्यानंतरही उपरकर यांनी मनसे प्रवेशाचा प्रचार केला. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना तिथंच थांबायला लावलंय. ‘उद्या कुणीही उठेल आणि मनसेत येतो म्हणेल. मनसे ही काही धर्मशाळा नाही’ असं म्हणत राज ठाकरे यांनी उपरकर यांना ‘उपऱ्या’ची पदवी बहाल केलीय.
शिवसेनेतील अनेक नाराज मनसेत येण्याच्या तयारीत असले तरी मनसेने त्यांना हिरवा कंदिल दाखवलेला नाही.