मतांसाठी दंगलखोरांना मुभा- राज ठाकरे

सीएसटी दंगलप्रकरणी राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा गृहखात्यावर हल्लाबोल केलाय. ‘मतांसाठी दंगलखोरांना पाठिशी घातलं जातंय’, असा आरोप त्यांनी यावेळी केलाय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 13, 2012, 06:42 PM IST

www.24taas.com, नाशिक
सीएसटी दंगलप्रकरणी राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा गृहखात्यावर हल्लाबोल केलाय. ‘मतांसाठी दंगलखोरांना पाठिशी घातलं जातंय’, असा आरोप त्यांनी यावेळी केलाय. मनसेचं टोलविरोधी आंदोलन दडपलं जातं मात्र, आझाद मैदानावरच्या या मोर्च्याला परवानगी कशी मिळते? असा सवाल त्यांनी सरकारला केलाय.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. गृहमंत्री मुंबईची शांतता बिघडविणाऱ्या दंगलखोरांची पाळेमुळे खणून काढणार की त्यांच्यासमोर शेपूट घालणार तेच मला पाहाचंय, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली होती.
पुण्याचे बॉम्बस्फोट, मावळचा गोळीबार, जालन्यातील वारक-यांवरील पोलीसांचा अमानुष अत्याचार असो वा राज्यातील वाढती गुन्हेगारी या सर्व आघाड्यांवर आबा सपशेल नापास ठरल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली होती. आज नाशिकमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय. ‘संयम बाळगा’ या मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या आवाहनावरही राज यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
शुक्रवारी, आसाम आणि म्यानमारमधल्या हिंसेचा निषेध करण्यासाठी आझाद मैदानमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये हिंसाचार उफाळला होता. या रॅलीत पन्नास हजारांपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. या हल्ल्यात मीडियाला आणि पोलिसांना लक्ष्य करण्यात आलं होतं. या वेळी झालेल्या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू झाला होता तर ५५ जण जखमी झाले होते.