भाजप सरकार आघाडीच्याच वाटेवर, राज ठाकरेंची 'आरे'वरून टीका

राजकारण्यांची दुधाची डेअरी चालवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारी मालकीचा आरे दुग्धप्रकल्प संपवला. आता राज्यात सत्ताबदल झाल्यावरही भाजपा सरकार आघाडी सरकारचीच री ओढत असून यासाठीच तुम्ही सत्तेवर आलात का? असा सवाल मनसेअध्यक्ष राज ठाकरे  सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. 

Updated: Mar 16, 2015, 02:43 PM IST
भाजप सरकार आघाडीच्याच वाटेवर, राज ठाकरेंची 'आरे'वरून टीका title=

मुंबई: राजकारण्यांची दुधाची डेअरी चालवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारी मालकीचा आरे दुग्धप्रकल्प संपवला. आता राज्यात सत्ताबदल झाल्यावरही भाजपा सरकार आघाडी सरकारचीच री ओढत असून यासाठीच तुम्ही सत्तेवर आलात का? असा सवाल मनसेअध्यक्ष राज ठाकरे  सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. 

आरेतील जमीन बिल्डरांना विकण्याचा डाव असून निवडणुकीत दिलेल्या आर्थिक पाठबळाची परतफेड केली जात आहे असा आरोपही ठाकरे यांनी केला आहे. 

आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी मेट्रो ३ च्या प्रस्तावित कारशेडच्या जागेची पाहणी केली. पाहणी दौऱ्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनसेची भूमिका मांडली. आरेतील जमिनीवर निवासी आणि व्यावसायिक संकुल बांधण्याचा घाट घातला जात असून स्थानिंकाची मतं जाणून न घेता थेट मेट्रो प्रकल्पाच्या टेंडरप्रक्रियेला सुरुवात कशी केली जाऊ शकते असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. 

आरेमध्ये वन्यप्राणी नसल्याचं पत्र सरकारनं जपान सरकारला दिलं आहे. यासंदर्भात गुढी पाडव्यानंतर चित्रफित दाखवून आरेत कोणत्या प्रकारचे वन्यप्राणी राहतात याचा खुलासा करु, असं राज ठाकरेंनी जाहीर केलं. राज्य सरकारनं सगळंच विकायला काढलं असून हा पूर्वनियोजित भाग आहे, केकमधील कोणता वाटा कोणाला मिळणार हेदेखील ठरलंय असा टोला त्यांनी लगावला.

पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दे-

  • वरळीतील 'आरे'च्या जागेवरही डोळा, राज ठाकरेंचा घणाघात 
  • 'आरे'त फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याचा डाव
  • यार्डच्या आडून बिल्डरांसाठी जागा खुली करणार
  • राज ठाकरेंचा राज्य सरकारवर आरोप
  • भाजप सरकार आघाडी सरकारच्याच वाटेवर
  • लोकांना विश्वासात न घेता प्रकल्प हातात घेतला
  • जमिनी हडप करण्याचा राजकऱ्यांचा डाव
  • मी प्रगतीच्या विरोधात नाही, मेट्रोला माझा विरोध नाही, पण प्रकल्पग्रस्तांच काय - राज ठाकरे
  • आरे कॉलनीत वन्य प्राणी नसल्याचं पत्र जपान सरकारला पाठवण्यात आलंय- राज ठाकरे
  • लोकांपासून लपवून प्रकल्प करणार असाल तर विरोध होणारच - राज ठाकरे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.