www.24taas.com, मुंबई
फेब्रुवारी महिन्यापासून घरगुती गॅसची सबसिडी थेट तुमच्या बँक अकाउन्टमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांकडे आधार क्रमांक नाही किंवा गॅस एजन्सीला त्यांनी कळविले नाहीत त्यांना सवलतीच्या दाराशिवाय सिलिंडर घ्यावे लागतील. तेल कंपन्यांनीही आधार कार्ड नसणाऱ्या ग्राहकांना सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे ग्राहकांची मात्र पंचाईत झालीय.
तुम्ही अजूनही आधार कार्ड काढलं नसेल तर आता मात्र त्याचा फटका तुमच्या खिशाला बसणार आहे. कारण फेब्रुवारी महिन्यापासून घरगुती गॅसची सबसिडी थेट तुमच्या बँक अकाउन्टमध्ये जमा होणार आहे आणि ज्यांनी आधार कार्ड काढलं नसेल त्यांना गॅस सिलिंडर बाजार भावाप्रमाणेच पैसे मोजावे लागतील. तेल कंपन्यांनीही आधार कार्ड नसणाऱ्या ग्राहकांना सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
फेब्रुवारीपासून गॅस ग्राहकांना सिलिंडरच्या सबसिडीचे पैसे थेट बँक खात्यात ट्रान्सफर करण्याचा प्रस्ताव आहे. हा निर्णय लागू झाल्यानंतर ज्या ग्राहकांकडे आधार क्रमांक नाही किंवा गॅस एजन्सीला ज्यांनी कळविलं नाही त्यांना सवलतीच्या दराशिवाय सिलिंडर विकत घ्यावं लागेल, अशी माहिती इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक एन. श्रीकुमार यांनी दिलीय.
राज्यात अजूनही निम्यापेक्षा जास्त लोकांना आधार क्रमांक मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात मुंबईसह सहा विभागांमध्ये ‘डायरेक्ट कॅश ट्रान्सफर’ची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे निर्णयावर लोकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. ही पद्धत यशस्वीरित्या राबवण्यासाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय.