भाजपच्या भव्य-दिव्य शपथविधीची 'वानखेडे'वर तयारी!

भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी प्रचंड थाटामाटात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार, हे स्पष्ट झालं आणि वानखेडे स्टेडियमवर या जंगी सोहळ्याची तयारी सुरू झालीय. महाराष्ट्रात भाजप मुख्यमंत्र्याच्या शपथविधी समारंभाची थीम ही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या ‘समुंदर मे खिलेगा कमल’ या घोषणेवर बेतलेली आहे. ८०च्या दशकात मुंबईतल्याच एका सभेत वाजपेयींनी ही घोषणा केली होती.  

Updated: Oct 29, 2014, 10:45 AM IST
भाजपच्या भव्य-दिव्य शपथविधीची 'वानखेडे'वर तयारी! title=

मुंबई : भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी प्रचंड थाटामाटात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार, हे स्पष्ट झालं आणि वानखेडे स्टेडियमवर या जंगी सोहळ्याची तयारी सुरू झालीय. महाराष्ट्रात भाजप मुख्यमंत्र्याच्या शपथविधी समारंभाची थीम ही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या ‘समुंदर मे खिलेगा कमल’ या घोषणेवर बेतलेली आहे. ८०च्या दशकात मुंबईतल्याच एका सभेत वाजपेयींनी ही घोषणा केली होती.  

वाजपेयींकडून प्रेरणा घेतच शपथविधी समारंभाची थीम तयार करण्यात आलीय. ‘एसएस लाईट’ नावाची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी या कार्यक्रमाचं व्यवस्थापन करतेय. हा सगळा सोहळा अनेक कॅमेऱ्यांमध्ये कैद करण्यात येणार आहे. 
 
मुख्यमंत्र्यांनी शपथ घेताच समुद्रकिनारी आतिषबाजी करण्याचीही योजना आहे. तसंच ५० ते ६० बोटींवर कमळाच्या फुलाचं कटआऊट लावण्याचाही बेत आखला जातोय. शपथविधीसाठी तीन हजार व्हीव्हीआयपींना निमंत्रण पाठवण्यात आलंय. या सोहळ्याला ४० हजार लोक उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे.

वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या भव्य सोहळ्याला देशभरातले दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, नितीन गडकरी, सुषमा स्वराज यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. 

तसंच, उद्योगविश्व, बॉलिवूड आणि क्रिडाजगतातल्या बड्या हस्तीही यावेळी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित असतील... बिग बी अमिताभ बच्चन, सलमान खान, उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, गोदरेज परिवार, टाटा समूहातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. विरोधी पक्षांमधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृ्थ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. 
 
या समारंभासाठी तीन व्यासपीठं तयार करण्यात येत आहेत. यातल्या नऊ फूट उंचीवरच्या स्टेजवर मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांना शपथ देण्यात येईल. अन्य दोन स्टेज व्हीयआपींसाठी असतील. पाच हजार विशेष निमंत्रितांसाठी मैदानात खुर्च्या टाकल्या जातील तर २५ हजार जण स्टेडियमच्या स्टँडमध्ये बसतील.

इतक्या मोठ्या संख्यनं व्हीव्हीआयपी येणार असल्यामुळे सुरक्षाही तेवढीच कडक असणार, हे उघड आहे... ही सुरक्षाही कशी असेल त्याची आखणी करण्यात आलीय, अशी माहिती डीसीपी धनंजय कुलकर्णी यांनी दिलीय. 

राज्यात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. त्यामुळे हा सोहळा कायमस्वरुपी स्मरणात रहावा, यासाठी प्रदेश भाजपनं जय्यत तयारी केलीयं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.