सिमेंटच्या जंगलात जिवंत झाडांवर विषप्रयोग!

मुंबईतील मोक्याच्या आणि धंद्यासाठी सोयीच्या जागांवरील झाडांचा अडसर दूर करण्यासाठी दिवसाढवळ्या या वृक्षांवर विषप्रयोग करण्याचे षड्यंत्र राबवलं जातंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 11, 2014, 10:29 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील मोक्याच्या आणि धंद्यासाठी सोयीच्या जागांवरील झाडांचा अडसर दूर करण्यासाठी दिवसाढवळ्या या वृक्षांवर विषप्रयोग करण्याचे षड्यंत्र राबवलं जातंय. मालाड, कांदिवली, गोरेगाव बोरीवली, दहिसर इथं असे प्रकार मोठया प्रमाणावर होत असल्याचे आढळलंय. याबाबत पर्यावरणप्रेमींनी  महापालिकेकडे या प्रकरणी तक्रारपुरावे सादर  करूनही  कारवाई न केल्यामुळे पर्यावरणप्रेमी  नागरिक संतप्त झालेत.
छाटलेल्या फांद्या... सुकलेली झाडं... झाडांना ठोकलेले खिळे... अशीचं दृश्यं मुंबईत ठिकठिकाणी पाहायला मिळतायत. एकीकडे सिमेंट कॉक्रिंटची जंगलं वाढत असताना मुंबईत झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. मॉल, बँका, हॉटेल्स आणि बिल्डिंग यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांची विषप्रयोग करुन कत्तल केली जातेय. लिंक रोडवर असे प्रकार सर्रासपणे पाहायला मिळतायत.
विषप्रयोग करुन झाडं मारली जात असल्याचे पुरावे देऊनही पालिकेक़डून कोणतीही कारवाई केली जात नाही. झाडाच्या खोडावर खिळे ठोकून विष टाकलं जातं. दोन ते तीन इंच खोल छिद्रात विष टाकल्यावर त्यातून पांढऱ्या रंगाचा चिवट द्रव बाहेर येतो. हा द्रव म्हणजेच रासायनिक विष असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी अविशा कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलाय.
जोगेश्वरी ते दहिसर या भागातील झाडांच्या फांद्यांची छाटणी महापालिकेकडून करण्यात येतेय. त्यामुळे ही छाटणी म्हणजे झाडांच्या कत्तलीचा सनदशीर मार्ग आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.