www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आवाज कुणाचा... शिवसेनेचा... ही घोषणा पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्या सायलेन्स झोनमध्ये घुमणार आहे. कारण शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई हायकोर्टाने परवानगी दिलीय.. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असले तरी या मेळाव्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असणार नाहीत, ही रूखरूख मात्र त्यांना बोचत राहणार आहे....
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे हे शब्द अजूनही शिवाजी पार्कवर घुमत असतील... दरवर्षी दस-याच्या मुहूर्तावर विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवसैनिकांची होणारी गर्दी आणि या गर्दीला शिवसेनाप्रमुखांचे मार्गदर्शन ही गेल्या 40 वर्षांतील परंपराच बनून गेली होती... शिवसेना दसरा मेळाव्यातलं `एक नेता, एक मैदान` असं समीकरण जगाच्या पाठीवर कुठेही नसेल... पण गेल्यावर्षी बाळासाहेबांचे निधन झालं आणि हे समीकरण खंडित झालं...
दरम्यान, यंदा शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. कारण शिवाजी पार्क सायलेंस झोन म्हणून घोषित करण्यात आलंय... त्यामुळं मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळवण्यासाठी शिवसेनेला मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागला. अखेर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा आणि न्या. संकलेचा यांच्या खंडपीठानं परवानगी दिलीय... शिवसेनेनं ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी सूचनांचं पालन करावं, सर्व नियमांची अंमलबजावणी करावी, नियमांचे पालन केले की नाही हे तपासण्यासाठी शिवसेना, पोलीस, महापालिका आणि व्ही कॉम यांची समिती नेमावी तसंच आवाज फाऊंडेशनने स्वतंत्रपणे ध्वनी प्रदूषणाची तपासणी करावी, असे कोर्टानं स्पष्ट केलंय...
शिवसेना आणि शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्याची परंपरा यंदाही सुरूच राहणार आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतरचा शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. गुलालाची उधळण करत, वाजतगाजत शिवसैनिक यंदाही दसरा मेळाव्यासाठी जमतील... परंतु त्यांचं दैवत म्हणजे बाळासाहेब ठाकरे यावेळी शिवसैनिकांना साक्षात दर्शन देणार नाहीत.. अगदी गेल्यावेळेप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवादही साधणार नाहीत... पण तरीही बाळासाहेब शिवसैनिकांच्या हृदयात कायम जिवंत राहतील...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.