मुंबई : शिवसेनेचे वय पन्नास वर्षे झाले असले तरी त्यांची वर्तणूक मात्र पाच वर्षांच्या लहान मुलासारखी आहे. नाइटलाइफ आणि ओपन जिमपाठोपाठ आता बालहट्टाचा तिसरा एपिसोड म्हणजे पेंग्विन अशी बोचरी टीका काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर आणि अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.
मुंबई महापालिकेतर्फे भायखळा येथील जिजामाता उद्यानात पेंग्विन आणण्यात आले आहेत. याचा नितेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “मुंबईच्या वातावरणात पेंग्विन जगतील का? हा खरा प्रश्न असून याबाबत आधी अभ्यास करण्याची गरज होती. मात्र बालहट्टासमोर झुकून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील वातावरणात पेंग्विन जगणे अशक्य असल्याने उद्या त्यांचे काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?
त्यानंतर महापौर, नगरसेवक आणि संबंधित पदाधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्यात येईल. पण बालहट्ट करणाऱ्यावर कुणीही बोट दाखवणार नाही.”
मुंबईत रस्ते, कचरा, पाणी आणि नाल्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायचे सोडून मुंबईकरांच्या डोक्यावर पेंग्विन आणून का बसवताय? बिबटे आणि वाघांना वाचवण्याची खरी गरज असताना जनतेच्या पैशांवर बालहट्ट पुरवला जात आहे.
मुंबईत पेंग्विन जगणे अशक्य असल्याने ते आणण्याचा निर्णय घेणे अत्यंत चुकीचा आहे. इंटरनेटद्वारे किंवा फोनवरून त्याबाबतची माहिती काढणे आवश्यक होते. पोकेमॉन खेळता, मग व्यवस्थित माहिती घेऊन निर्णय घ्यायचे ना, अशा शब्दांतही नितेश राणे यांनी सेनेवर टीकास्त्र सोडले.