महिना 90,000 कमवणारा पारसी 'गरिब' - हाय कोर्ट

महिन्याला 90,000 रुपयांपेक्षा कमी रक्कम कमावणारा प्रत्येक पारसी गरीब असल्याचा निर्वाळा, मुंबई हायकोर्टानं दिलाय. 

Updated: Oct 24, 2014, 10:33 PM IST
महिना 90,000 कमवणारा पारसी 'गरिब' - हाय कोर्ट title=

मुंबई : महिन्याला 90,000 रुपयांपेक्षा कमी रक्कम कमावणारा प्रत्येक पारसी गरीब असल्याचा निर्वाळा, मुंबई हायकोर्टानं दिलाय. 

बॉम्बे पारसी पंचायतीनं 'गरीब आणि गरजवंत पारसी'ची केलेली व्याख्या मुंबई हायकोर्टानं ग्राह्य धरलीय. यानुसार, ज्या पारसी व्यक्तीची महिन्याची मिळकत 90 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे किंवा ज्यांच्याकडे 25 लाख रुपयांपेक्षा कमी संपत्ती आहे, तो गरीब समजला जावा. 

उल्लेखनीय म्हणजे, 2013-14 मध्ये भारताच्या ग्रामीण क्षेत्रात महिन्याला 816 रुपयांपेक्षा कमी आणि शहरांत 1000 रुपयांपेक्ष कमी खर्च करणाऱ्या व्यक्तीला गरीबी रेषेच्या खाली असल्याचं मानलं गेलंय. 

काय आहे प्रकरण... 
गुजरातच्या नजिक डहाणूमध्ये राहणाऱ्या रोहिंटन तारापोरवाला यांनी पंथकी बाग, अंधेरीच्या 'कम्युनिटी हाउसिंग सोसायटी'विरुद्ध याचिका दाखल केली होती.

आपल्या आणि आपल्या पत्नीच्या स्वास्थ्य ध्यानात घेता आपल्याला सोसायटीद्वारे मुंबईमध्ये घर मिळणं आवश्यक असल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं होतं. 

यावर पंचायतीनं, तारापोरवाला सध्या 2000 वर्गफूटात बनलेल्या दुमजली इमारतीत राहत असून त्यांचं महिन्याचं उत्पन्न 90 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच, ते सोसायटीद्वारे मुंबईत घर मिळण्यासाठी पात्र नाहीत. त्यांचा मुलगा-मुलगीही सध्या अमेरिकेत आपल्या कुटुंबीयांसह राहत आहेत. तारापोरवाला यांची मुंबईच्या बाहेर 17 एकर जमीनही आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जमिनीची किंमत 51 लाख रुपये आहे.

ही घरं केवळ 'गरीब आणि गरजवंत' लोकांसाठी असल्यानं तारापोरवाला यांच्या याचिकेवर हायकोर्टानं सुनावणी करण्यास नकार दिला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.