बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशी सुरुच

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवला असला तरी हा संप दुसऱ्या दिवशी सुरुच ठेवण्यात आला आहे. या संपामुळे सामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता संपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 2, 2014, 08:22 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मुंबई हायकोर्टानं बेकायदेशीर ठरवला असला तरी हा संप दुसऱ्या दिवशी सुरुच ठेवण्यात आला आहे. या संपामुळे सामान्य मुंबईकरांचे हाल होत आहेत. त्यामुळे आता संपकरी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता अधिक आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात बेस्ट प्रशासन कोर्टात गेलं होतं. यावेळी तुम्ही संप केलाय का, अशी विचारणा कोर्टानं केली. त्यावेळी संप केला नसल्याचं उत्तर कर्मचाऱ्यांनी कोर्टाला दिलं. त्यानंतर हा संप अवैध असल्याचं कोर्टानं सांगितलंय. दरम्यान, कॅनेडियन पद्धतीच्या वेळापत्रकाला मान्यता असल्याचं युनियन लीडर उदयकुमार आंबोणकर यांच्या सहीचं पत्र ‘झी २४ तास’च्या हाती लागलंय. त्यामुळे, जर ही पद्धत मान्य नव्हती, तर या पत्रावर सहीच का केली? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.
बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी जाचक असलेलं कॅनेडियन वेळापत्रक मागे घ्या, अन्यथा कर्मचारी कामावर रुजू होणार नसल्याची भूमिका शरद राव यांच्या संघटनेनं घेतलीय. बेस्टच्या ड्रायव्हर, कंडक्टर्ससाठी कामाचे १२ तास अतिशय जाचक असल्याचं त्यांनी म्हटलंय.
बेस्ट प्रशासन कॅनेडियन वेळापत्रक लागू करण्यावर ठाम आहे तर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी सकाळपासून बोलावलं आहे. मात्र अजूनही कुणीही आलं नसल्याची प्रतिक्रिया बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांनी दिलीय. तसंच याप्रकरणी शरद राव राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.