राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर २८ ऑक्टोबरला होणार शिक्कामोर्तब

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर भाजपातर्फे कोणाची वर्णी लागणार याचं उत्तर २८ ऑक्टोबर रोजी भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मिळणार आहे. २८ ऑक्टोबरला मुंबईत भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा हे या बैठकीत निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

Updated: Oct 26, 2014, 07:59 PM IST
राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर २८ ऑक्टोबरला होणार शिक्कामोर्तब title=

मुंबई: महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर भाजपातर्फे कोणाची वर्णी लागणार याचं उत्तर २८ ऑक्टोबर रोजी भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मिळणार आहे. २८ ऑक्टोबरला मुंबईत भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा हे या बैठकीत निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

दिवाळी संपताच राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. आज भाजपा नेत्यांनी एकनाथ खडसे यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस आदी ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत सत्ता समीकरणांवर चर्चा झाली. २८ ऑक्टोबरला भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून या बैठकीत विधीमंडळ नेत्याची निवड होईल आणि त्यानंतरच मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागेल हे स्पष्ट होईल. 

सकाळी ११ वाजता विधानभवनात ही बैठक होईल अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. विधीमंडळ नेत्याची निवड झाल्यावर सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा करु असं भाजपा नेत्यांनी सांगितलं. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत, असं सूचक विधान विनोद तावडे यांनी केलं.

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचं समजतं. मात्र नितीन गडकरी, एकनाथ खडसे यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरु केलं आहे.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १२२ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपाप्रणीत महायुतीतील मित्रपक्षाला एका जागेवर विजय मिळाल्यानं भाजपाचं संख्याबळ १२३ पर्यंत पोहोचलं आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपाला आणखी २१ आमदारांची गरज आहे. तर शिवसेना ६३ आमदारांसह दुसऱ्या जागेवर आहे. मात्र ४१ आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं यापूर्वीच भाजपाला बाहेरुन पाठिंबा जाहीर केला आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.