'कसाब'फेम कोठडीत राष्ट्रवादी नेता!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांची रवानगी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी क्रूरकर्मा कसाब याच्यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष कारागृहात करण्यात आलीय. 

Updated: Nov 28, 2015, 11:58 AM IST
'कसाब'फेम कोठडीत राष्ट्रवादी नेता! title=

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांची रवानगी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी क्रूरकर्मा कसाब याच्यासाठी बनवण्यात आलेल्या विशेष कारागृहात करण्यात आलीय. 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यावधींच्या घोटाळ्या प्रकरणी रमेश कदम यांना ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून सीआडीचं पथक त्यांच्या मागावर होतं. अखेर पुणे-नगर रस्तावरील ग्रँड हयात या पंचतारांकीत हॉटेलमधून त्यांना अटक करण्यात आली होती. रमेश कदमांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आल्याचं पक्षानं जाहीर केलं असलं तरी ज्येष्ठ नेत्यांचा वरदहस्त त्यांच्या पाठिशी असल्याचं सांगण्यात येतंय.

मिळालेल्या माहितीनुसार, 'कसाब' फेम या सेलचं वैशिष्ट्य म्हणजे, या सेलमध्ये एअर कंडिशनचीही सोय आहे. एखाद्या वैद्यकीय आणीबाणीप्रसंगी गरज लागल्यास कसाबसाठी ही सोय इथं करण्यात आली होती. २१ नोव्हेंबर २०१२ ला कसाबला फाशी दिल्यानंतर या सेलमध्ये कोणत्याही कैद्याला हलवण्यात आलं नव्हतं.

रमेश कदमांचा घोटाळा...
अण्णाभाऊ साठे महामंडळात २५० कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे ३७०० पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले असल्याचा दावा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केलाय. या घोटाळ्याबाबत महामंडळाचे माजी अध्यक्ष आमदार रमेश कदम यांच्यावर ढोबळेंनी थेट आरोप केलाय. राष्ट्रवादी कदमांना पाठिशी घालत असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा दावाही ढोबळेंनी केला होता. महामंडळाच्या माजी अध्यक्षांचा थेट १३० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात संबंध असून त्यांनी कर्ज दिलेल्या संस्था कागदावरच असल्याचा दावा ढोबळेंनी केलाय. कदम यांनी हा पैसा मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणी बांधकाम व्यवसायात लावल्याचंही त्यांनी म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.