शिवसेनेने उतरवली पुनमची 'नशा'

'प्रसिद्धीसाठी काय पण’ म्हणत पूनम पांडेने ‘नशा’ या चित्रपटाचं (आणि चित्रपटातून स्वत:च) जोरदार प्रदर्शन करायला सुरुवात केली...

Updated: Jul 22, 2013, 05:12 PM IST

www.24taas.com,झी मीडिया,मुंबई
'प्रसिद्धीसाठी काय पण’ म्हणत पूनम पांडेने ‘नशा’ या चित्रपटाचं (आणि चित्रपटातून स्वत:च) जोरदार प्रदर्शन करायला सुरुवात केली. तिच्या अंगप्रदर्शनाची विकृत पोस्टर्स शहरभर दिसली. पण, चित्रपट सेनेनं मात्र या पोस्टरला प्रखर विरोध दर्शवत आपल्या स्टाईलनं पुनमची 'नशा' उतरवलीय.

'नशा' या चित्रपटाला प्रखर विरोध दर्शवत शिवसेनेच्या चित्रपट सेनेनं ही पोस्टर्स फाडून त्यांची होळी केली. '२४ तासांत नशा सिनेमाचे पोस्टर्स मुंबईतून काढून टाकले नाहीतर शिवसेना स्टाईलने धडा शिकवू' असा इशाराही शिवसेने चित्रपट सेनेनं दिलाय.
पूनम पांडेच्या येणाऱ्या 'नशा' या चित्रपटाचे पोस्टर्स संपूर्ण शहरभर लावण्यात आले होते. या फोटोत पूनम पांडेचे नग्नावस्थेतील पाठमोरे छायाचित्र आहे. या अश्लील पोस्टरबाजीविरोधात शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली आज चित्रपट सेनेचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि नशा चित्रपटाची पोस्टरर्स फाडून ती जाळून टाकण्यात आली. 'नशा' बनविणाऱ्या ईगल होमचे प्रोड्युसर आदित्य भाटिया यांना शिवसेना चित्रपट सेनेने तातडीचा फॅक्स पाठवून हे अश्लील पोस्टर्स दोन दिवसांत शहरातून हटवण्याबद्दल चांगलीच तंबी भरलीय.

‘नशाचे विकृत पोस्टर पाहून विद्यार्थी-विद्यार्थिनी, माता-भगिनींची मान लज्जेने खाली जातेय. प्रसिद्धीला आमचा विरोध नाही, पण असली विकृत प्रसिद्धी आम्ही खपवून घेणार नाही. सेन्सॉर बोर्डाने असल्या नग्न प्रसिद्धीस परवानगी दिली कशी? आणि परवानगी दिली नसेल तर अशी छायाचित्रे पोस्टरवर झळकली कशी? असा नंगानाच खपवून घेतला जाणार नाही. प्रेक्षकांनीही असल्या विकृतांना धडा शिकवावा’ असं म्हणत आदेश बांदेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.