मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांचे 45 हजारांचे दल सज्ज झालंय. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अतिसंवेदनशील अशा 46 ठिकाणी ड्रोनच्या मदतीनं मुंबई पोलीस खास लक्ष ठेवणार आहेत.
गणेशोत्सवाची धामधूम आणि आयसीसचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी मुंबईला अक्षरशः छावणीचं स्वरूप दिलंय. ठिकठिकाणी नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन सुरू झालंय. तब्बल 45 हजारांचं पोलीस दल मुंबईच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून पाहारा करतंय. त्याशिवाय निमलष्करी दल, होमगार्ड, रस्ता सुरक्षा आणि छात्रसेनेचे विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक यांचीही मदत घेतली जाणार आहे.
गणपती आगमन आणि विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता मुंबई वाहतूक पोलिसांनीही आपला कृती आराखडा तयार केला आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी 5 कंट्रोल रूम बनवण्यात आल्या आहेत. गिरगाव चौपाटीवर एक मोठी कंट्रोल रुम बनवली जाणार आहे. या कंट्रोल रुमला शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, बांद्रा, पवई, मालवणी, मार्वे या ठिकाणी तयार करण्यात येणा-या कंट्रोल रूम जोडलेल्या असणार आहेत. ३००० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे, ३७ वॉच टॉवर, जीपीएस सिस्टम लावण्यात येणार आहेत. मिरवणूक काळात, ४९ रस्ते पुर्णतः बंद केले जाणार आहेत.
५५ रत्यांवरील वाहतूक वनवे केली जाईल. १८ रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात येईल. तर ९९ रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आलीये. चौपांट्यांवर ३ हज़ार स्टिल प्लेट्स टाकल्या जाणारायत. मुंबईत ६ हजार सार्वजनिक गणपती आणि १ लाख २१ हजार २२६ घरगुती गणपती मुंबई असतात. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात येणारायत. गणपती विसर्जनाच्या दिवशी आवाजाचं बंधन रात्री 10 वरून मध्यरात्री 12 पर्यंत वाढवण्यात आलंय. पण ६५ डेसिबलची मर्यादा मात्र कायम ठेवण्यात आलीये. मुंबईकरांचा गणेशोत्सव उत्साहात साजरा व्हावा, यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.