www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई महापालिकेनं तब्बल ३१ हजार कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. तर बजेटहून अधिक म्हणजे तब्बल ३३ हजार कोटी रुपयांच्या मुंबई महापालिकेच्या ठेवी विविध बँकांमध्येही आहेत. यावर सामान्यांचा विश्वास बसणार नाही. म्हणजे तिजोरी फुल्ल असली तरी विकास कामात मात्र उदासिनता दिसत आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात तब्बल ३१ हजार १७८ कोटी रुपयांचे बजेट सादर केले गेले असले तरी गेल्या दहा वर्षांचा विचार करता भांडवली खर्चातील सरासरी ७० टक्के रक्कमच खर्च होत आली आहे. २००८-०९च्या सुधारीत अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी ५६३६ कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु यापैकी ६८ टक्के म्हणजे ३८६१ कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च करण्यात आले.
२००९-१० मध्ये ७३ टक्के, २०१०-११ मध्ये ७७ टक्के, २०११-१२ मध्ये ७१ टक्के रक्कम आणि २०१२-१३ मध्ये ६९ टक्के भांडवली खर्च झाला. यावर्षी तर आतापर्यंत केवळ २२ टक्केच खर्च करण्यात आलेत. म्हणजे खर्च न झालेली रक्कम मुंबई महापालिका विविध प्रकारच्या २६ फंडांमध्ये गुंतवत आली आहे. ही रक्कम तब्बल ३३ हजार कोटी रुपयांवर गेलीय.
व्याजापोटी बीएमसीला एक हजार कोटी रुपयेही मिळतात. म्हणजे बीएमसीकडं निधीची कमतरता नाही, कमतरता आहे ती नियोजनाची. २०१४-१५ च्या बजेटमध्येही भांडवली खर्चासाठी अकरा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जी प्रामुख्यानं मुंबईच्या विकास कामांसाठी वापरली जाते. परंतु ही रक्कम पूर्णपणे खर्च होत नसल्यानं शहरांच्या विकास कामांवर परिणाम होतोय. सत्ताधा-यांना मात्र हे मान्य नाही.
बीएमसी प्रशासनाकडं व्हीजन आणि नियोजन नसल्यामुळं मुंबईकरांना अनेक सोयींपासून वंचित राहावं लागतंय. निधी आहे परंतु तो खर्च करण्याची कुवतच बीएमसीकडं नसल्याचं समोर आलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.