मुंबई : मोनो रेल काल मध्येच बंद पडल्याने तब्बल दीड ते दोन तास प्रवासी त्यामध्ये अडकले होते. त्यामुळे सुट्टी साजरी करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना कालची मोनो रेलची राईड जिवावर बेतणारी ठरली. कालच्या घटनेनंतर सोमवारी म्हमजेच आज मोनो रेलमधून प्रवास करायचा का असा प्रश्न तर अनेकांना पडला पण मुंबईकरांनी नेहमीप्रमाणे यावरही तोडगा काढला.
रविवारी मुंबईकरांच्या मोनो डार्लिंगनं मुंबईकरांना चांगलाच दगा दिला. मोनोची वीज गायब झाल्यामुळे वडाळ्याहून चेंबुरला निघालेली मोनो भक्तीपार्क स्टेशनजवळ सकाळी आठ वाजता मध्येच बंद पडली.
प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडे काहीच सोय नसल्यानं अखेर फायरब्रिगेडनं क्रेननं प्रवाशांना बाहेर काढलं. आता ही जीव टांगणीला लावणारी दृश्यं पाहिल्यावर सोमवारी मोनो रेल्वे पकडायची की नाही, याबद्दल मुंबईकर जरा विचार करुनच बाहेर पडले.
यालाच म्हणतात मुंबईकरांचं स्पिरीट, मुंबईतल्या अनेक यंत्रणा अशा दगा देणार, हे समजून घेण्याचा समजूतदारपणा मुंबईकरांच्या रक्तातच आहे.... पण असं पुन्हा घडलं तर ते परवडणारं नाही. मुळात मोनो उंचावर असते.... दरवाजे बंद त्यामुळे वीज गेल्यावर श्वास घेण्याचीही सोय नाही.... तो रविवारच होता.... त्यामुळे ऑफिसला जाणा-यांची फारशी गर्दी नव्हती.... पण कधीतरी मोनो बंद पडेल याचा अंदाज एमएमआरडीएला कसा आला नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
रेल्वेच्या तुफान गर्दीतुन सुटका व्हावी यासाठी काही प्रवासी आवर्जुन मोनो रेल ने प्रवास करतात. आता वर्षभरापासून मोनो ने प्रवास करणा-या प्रवाशांच्या मनात मोनोच्या प्रशासनाविषयी विश्वासही निर्माण झाला होता. पण कालच्या घटनेनंतर मोनोच्या सुरसा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या मोनो प्रशासनाने यावर उपाययोजना नेमुन त्या प्रवाशांपर्यंत पोहचलवल्या नाहीत तर प्रवाशांच्या संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.