www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिकीट दरवाढीच्या मुद्यावरुन राजकारण तापलं आहे. हा सर्व खेळ हा रिलायन्सला लाभ होण्यासाठी भाजप राजकारण सुरु करीत आहे, असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीत मेट्रो रेल्वेचे तिकीट दर वाढू देणार नाही, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.
राज्य सरकार आणि रिलायन्समध्ये अजूनही तिकीटाच्या दरांवरुन वाद सुरु आहेत. रिलायन्सने परस्पर केलेली तिकीट दरवाढ राज्य सरकारला अजिबात मान्य नाही. कोणात्याही परिस्थितीत तिकीटाचे दर तेरा रुपयांवरुन ४० रुपये होऊ देणार नाही. कायद्यानुसारच तिकीट दर आकारावे लागतील, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी रिलायन्सला बजावलेय.
रिलायन्सच्या फायद्यासाठी भाजपला उदघाटनाची घाई झाली आहे. मुंबई मेट्रोला गुरुवारी केंद्रीय रेल्वेबोर्डाकडून सुरक्षेशी संबंधित सर्व प्रमाणपत्र मिळाली. शनिवारी सकाळी मुंबई मेट्रोचे सीईओ अभय मिश्रा यांनी रविवारी उदघाटन होणार असल्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री चव्हाण यांच्या ईशाऱ्यानंतर रिलायन्सने पत्रकार परिषद घेऊन एक महिना केवळ 10 रुपये तिकीट दर आकारण्याची घोषणा केली आहे. कोणत्याही ठिकाणीसाठी एकच दर म्हणजे 10 रुपये असेल असे स्षष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या उद्घाटन होण्याचे संकेत मिळाले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.