मुंबई : मुंबई लोकलने प्रवास करताना गर्दीच्या बळींची संख्या वाढत आहेत. यावर उपाय म्हणून मेट्रोप्रमाणे लोकलचे कोच तयार करुन दरवाजे बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतलाय. मात्र, दरबाजे बंद करुन गर्दी कमी होणार नाही, असे म्हणत शिवसेनेने प्रभूंच्या निर्णयाला विरोध दर्शविलाय.
डोंबिवलीकर प्रवासी भावेश नकातेचा दोनच दिवसांपूर्वी धावत्या गाडीतून पडून मृत्यू झाला. मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या प्रश्नी मुंबई आणि ठाण्यातल्या दहा खासदारांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली.
या भेटीत मुंबईकरांच्या समस्या रेल्वेमंत्र्यांच्या कानावर घालण्यात आल्या. यापुढे फलाटाची उंची वाढवणे, दोन स्थानकांमध्ये मोबाईल अँब्युलन्स, १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्यात येतील. शिवाय दरवाजे बंद होतील. अशा गाड्याही लवकरच सुरू होतील, असं आश्वासन यावेळी प्रभूंनी दिलं.
मेट्रोप्रमाणेच लोकलचेही कोच तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही आश्वासन प्रभूंनी यावेळी सांगितलंय. रेल्वे गाडीचे डबे बंद कसे होतील याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यावेळी म्हणाले. मात्र, डबे बंद करून गर्दीचा प्रश्न सुटणार नसल्यानं या प्रस्तावाला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी विरोध दर्शवलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.